नववर्षाचे जल्लोषात स्वागत

By Admin | Published: March 22, 2015 12:31 AM2015-03-22T00:31:56+5:302015-03-22T00:31:56+5:30

साडेतीन मुर्हूतापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला शनिवारी शहरात ठिकठिकाणी शोभायात्रेतून हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Welcome to the New Year celebration | नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नववर्षाचे जल्लोषात स्वागत

googlenewsNext

नवी मुंबई : साडेतीन मुर्हूतापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला शनिवारी शहरात ठिकठिकाणी शोभायात्रेतून हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अबाल वृद्धांसह, महिला आणि तरूणाईने पारंपरिक पोशाखात स्वागतयात्रांमध्ये सहभाग घेत संस्कृतीचे दर्शन घडवले. स्वागत यात्रांमध्ये सहभागी झालेली लेझीम, ढोल ताशे पथके, शस्त्रकला, ग्रंथदिंडीने नवी मुंबईचे वातावरण मंगलमय केले.
सांस्कृतिक शहर समजल्या जाणाऱ्या पुण्यापाठोपाठ नवी मुंबईत देखील मराठी सणांचा उत्साह वाढला आहे. आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने घणसोली ते वाशीदरम्यान शोभायात्रा काढण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष राजू गावडे, शृंखला गावडे, विजय देशमुख यांच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ढोल - ताशांच्या गजरात लेझीम खेळत ही शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शस्त्र कलेचे प्रदर्शन देखील यावेळी करण्यात आले. सीबीडी येथील नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेषात मोठ्या उत्साहाने महिला आणि तरुण सहभागी झाले होते. यावेळी आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होत्या. याच परिसरातील खान्देश एकता मित्र मंडळाच्या वतीनेही पारंपरिक पध्दतीने गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. यावेळी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील आणि रोहिदास पाटील उपस्थित होते.
बेलापूर गावातील जिज्ञासा एज्युकेशन सोसायटीतर्फे भव्य स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील कलाकार उपस्थित होते. यामध्ये महिलांनी विविध खेळ सादर केले. चिमुकल्यांनी थोर पुरुषांच्या वेशभूषा परिधान करून आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली. सीवुड्स रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन आणि कवी कुसुमाग्रज वाचनालयाच्या वतीने पारंपरिक पध्दतीने शोभायात्रा काढण्यात आली. नेरूळमधील करावे गावातील ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन केले होते. यामध्ये शाळेचे विद्यार्थी आणि येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
ऐरोलीमधील नादगर्जा ढोल - ताशा पथक, संस्कार भारती ऐरोली समिती, सिध्दिगणेश मंदिर आणि ज्ञानदीप ग्राहक संघ यांच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नादगर्जा ढोल-ताशा पथकाच्या वतीने विविध ताल सादर करण्यात आले. (प्रतिनिधी)

अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने गणेश मंदिरापासून निघालेल्या शोभायात्रेत मल्लखांब, शिवकालीन शस्त्रकला, महिलांचे लेझीम पथक, ग्रंथदिडी हे विशेष आकर्षण ठरले. वाशीतील नागाई सामाजिक सेवा ट्रस्टच्या वतीने जागृतेश्वर मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली.
यामध्ये टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करण्यात आला. सर्वपक्षीयांच्या सहभागातून सानपाडा परिसरात ही शोभायात्रा निघाली. त्यामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास काजणे यांच्यासह रामचंद्र पाटील, रुचा पाटील यांच्यासह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पनवेल : खारघरमध्ये मी मराठी मंचातर्फे मोठ्या जल्लोषात गुढीपाडवा साजरा करण्यात करण्यात आला. खारघर सेक्टर ३५ हाईड पार्क याठिकाणाहून सकाळी ६.३० वाजता गुढी उभारून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे सर्व जाती-धर्माचे बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले होते. नादस्मृती ढोल पथक हे यावेळचे आकर्षण ठरले. भव्य चित्ररथ, शिवाजी, संभाजी, शहाजी, झाशीची राणी आदींच्या वेषभूषा परिधान केलेली बच्चे कंपनी देखील यावेळी सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या शोभायात्रेतच दिंडी, भजन मंडळांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढवली. मी मराठी मंचाच्या वतीने मंगेश राणे, जयंत शेठ, अमोल जोशी, उत्तम शेखर, मंगेश रानावडे यांनी या शोभायात्रेचे आयोजन केले होते. सकाळी ११ वाजता चेरोबा मंदिर सेक्टर १२ याठिकाणी शोभायात्रेची सांगता झाली. युवा नाद या ढोल पथकाच्या वतीने यावेळी तालरचना ही नवीन धून प्रदर्शित करण्यात आली. व्ही. के. हायस्कूल येथून सुरू झालेली ही शोभायात्रा गावदेवी पाडा, विरुपाक्ष मंदिर , टिळक रोड मार्गे सावरकर चौकात या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. या शोभायात्रेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा चारुशीला घरत, नगरसेवक मनोहर म्हात्रे, रमेश गुडेकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने पाम बीच, सोनखार, वाशी परिसरात संध्याकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक संदेश देण्यात आले. या शोभायात्रेत जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, निशांत भगत, वैजयंती भगत यांनी सहभाग घेतला.

Web Title: Welcome to the New Year celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.