Join us

नववर्षाचे स्वागत साधेपणानेच, निर्बंध कायम - अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:07 AM

अनिल देशमुख : रात्री ११ पर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार राहणार खुलेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचे संकट ...

अनिल देशमुख : रात्री ११ पर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार राहणार खुले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने आणि साधेपणाने करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी नागरिकांना केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेले निर्बंध कायम आहेत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री ११ पर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. रात्रीच्या जमावबंदीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. रात्री ११नंतर सर्व आस्थापना बंद होणार आहेत. रात्री घराबाहेर पडता येणार नाही. घराबाहेर जाऊन औषधे आणणे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत.

थंड हवेच्या ठिकाणी आणि पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली आहे. शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. अशा ठिकाणीही निर्बंधांचे पालन करण्याच्या सूचना त्या-त्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

* गर्दी करू नये, आतषबाजी टाळावी

राज्य सरकारने यापूर्वीच ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळात संचारबंदी लागू केली आहे. मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी आणि जुहू अशा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, शारीरिक अंतराचे पालन, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, ३१ डिसेंबरला रात्री उशिरा धार्मिक अथवा सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, नववर्षाच्या स्वागतासाठीची आतषबाजी टाळावी, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळी होणारी गर्दी टाळावी, अशा विविध सूचना यापूर्वीच जारी करण्यात आल्या आहेत.

---------------------