मुंबई : मुंबईच्या किमान सातत्याने घट नोंदविण्यात येत असून, येथील किमान तापमान गुरुवारी १६ अंश नोंदविण्यात आले आहे. मुंबईचे किमान तापमान पुढील काही दिवस १६ अंशावर स्थिर राहण्याची शक्यता असून, आजच्या नाताळचे स्वागत देखील गुलाबी थंडीने होत आहे. तर मुंबईच्या आतल्या भागाचा विचार करता गोरेगाव आणि पनवेल या ठिकाणी किमान तापमानाची नोंद १५ अंश झाली असून, किमान तापमानाचा पारा स्थिर राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परिणामी वर्षाखेर आणि नव्या सुरुवातीच्या पहिल्या पंधरा दिवसांपर्यंत तरी मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येणार आहे.
गेल्या रविवारपासूनच मुंबईच्या किमान तापमानात चांगली घट नोंदविण्यात येत आहे. येथील किमान तापमान १९ अंशापासून १५ अंशावर खाली उतरले असून, गेल्या चार दिवसांचा थंडीचा ट्रेंड हा १६ ते २० अंशादरम्यान आहे. विशेषत: गेल्या दोन दिवसांपासून किमान तापामान १५ ते १६ अंशावर स्थिर असून, चालू हंगामातील नीचांक नोंदविण्यात येत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १६.२ अंश नोंदविण्यात आले. मुंबईच्या आतील परिसरांचा विचार करता गोरेगाव येथील किमान तापमानाची नोंद १५.१० अंश झाली. पनवेल येथे १५.९४ अंश एवढया किमान तापमानाची नोंद झाली. वरळी, बीकेसी, कांदिवली, बोरीवली, मालाड, चारकोप आणि पवई येथील बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशाखाली नोंदविण्यात आले. किमान तापमानाचा हा ट्रेंड पुढील काही दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
----------------
शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये.पुणे ९.९नाशिक ९.२जळगाव १०.३औरंगाबाद १०.४नांदेड १०.५बारामती १०.९जालना ११मालेगाव ११.४उस्मानाबाद ११.५परभणी १२.२महाबळेश्वर १३.४मुंबई १६.२