- अजित मांडके, ठाणे ‘काही तरी कर, ठाणेकर’ च्या माध्यमातून सुरु केलेल्या चळवळीचा एक भाग म्हणून मोरयाचा जयजयकार कर, उगाच हॉर्न वाजविणे बंद कर, असे आवाहन लोकमतने ठाणेकरांना केले होते. त्याला साथ देऊन ठाण्यातील श्रीरंग, वृदांवन, ऋतुपार्क सोसायटीमधील सदनिकाधारक आणि सार्वजनिक मंडळांनी हॉर्न न वाजविता गणरायाचे जल्लोषात स्वागत केले आहे. विशेष म्हणजे लोकमतच्या या चळवळीत सहभागी होण्यासाठी त्यांनी हात जोडून इतरांनाही विनंती केली असून बाप्पाला निरोपही तशाच प्रकारे देण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे याबाबत ठाणेकरांत जागृती करण्यासाठी जाग या सामाजिक संस्थेनेही पुढाकार घेतला आहे.ठाण्यातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी एक पाऊल टाकून लोकमतने शहरातील समस्यांचे त्यांचे जनसामान्यांवर होणाऱ्या परिणामांची होर्डिग्ज, वृत्त आणि पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करुन काहीतरी कर ठाणेकर ही चळवळ उभी केली आहे. तिला आता अनेक पावलांची साथ मिळू लागली आहे. उगाच हॉर्न वाजविणे बंद कर या टॅगलाईनखाली लोकमतने ठाणेकरांना वाहतूककोंंडीस रस्त्यावर आणि त्यातही विनाकारण हॉर्न वाजवू नये असे आवाहन केले होते. त्यला पहिल्याच टप्यात ७५ सोसायट्यांमधील ३०० इमारतींनी साथ देऊन या चळवळीत सहभागी होऊन जनजागृती करण्याचा नारा दिला आहे.दरम्यान, मोरयाचा जयजयकार कर, उगाच हॉर्न वाजविणे बंद कर, या आशयाखाली सुद्धा ठाणेकरांना आवाहन केले होते. त्यानुसार या सोसायट्यांमधील अनेक रहिवाशांनी हॉर्न न वाजविता गणरायाचे जल्लोषात स्वागत केले आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी श्रींरग येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी सोसायटींमधील सभासदांनी एक बैठक घेऊन हात जोडून उगाच हॉर्न वाजवू नका, असे आवाहन सर्व सदस्यांना केले आहे. हॉर्न वाजविण्याचे मानवी आरोग्यावर कशा पद्धतीने दुरगामी परिणाम होतात, याची जाणीवही त्यांनी रहिवाशांना करुन दिली आहे. या बैठकीला चंद्रहास तावडे, प्रमोद सावंत, बाबा जाधव, हिमांशू गडकर आदींसह इतरांनी जनजागृतीचा विडा उचलला होता. तसेच आता या बैठकीत सहभागी झालेला प्रत्येक सदस्य हा आपल्या कुटुंबियांना आपल्या सहकाऱ्यांना या चळवळीची माहिती देणार असून ज्या पद्धतीने गणरायाचे आगमन हॉर्न न वाजविता केले. त्याच पद्धतीने गणरायाला निरोपही हॉर्न न वाजविता दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.‘लोकमत’च्या मोहिमेला वाढता पाठिंबासर्वसामान्य लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ठाण्यातील ‘जाग’ या संस्थेने देखील लोकमतच्या ‘काहीतरी कर, ठाणेकर’ या मोहीमेला जाहीर पाठींबा दर्शविला. तशा आशयाचे पत्रही मिलिंद गायकवाड यांनी लोकमतला पाठविले असून आपण सुरु केलेल्या मोहीमेत आमचेही सहकार्य असल्याचे जाहीर केले आहे.
हॉर्न न वाजविताच गणरायाचे स्वागत अन् निरोपही
By admin | Published: September 18, 2015 11:50 PM