Join us

महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी स्वागत सेल; दारात मिळणार सेवा

By सचिन लुंगसे | Published: January 01, 2024 7:05 PM

सेलशी संपर्क साधल्यानंतर संबंधित कामासाठी अधिकारी व कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारी जाऊन कागदपत्रांची पुर्तता करण्यासह विना विलंब सेवा देणार आहेत.

मुंबई : प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांच्या दारी स्वागत सेल सुरु करण्यात येत आहे. येत्या तीन दिवसांत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेल सुरु होणार आहे. याद्वारे ग्राहकांना नवीन वीज जोडणी, इतर वीज सेवा देण्यासह बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व सेवा कायम ठेवून ही अतिरिक्त सेवा सुरु करण्यात येत आहे. सेलशी संपर्क साधल्यानंतर संबंधित कामासाठी अधिकारी व कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारी जाऊन कागदपत्रांची पुर्तता करण्यासह विना विलंब सेवा देणार आहेत.

जिल्ह्यात किंवा महावितरणच्या मंडलस्तरावर अधीक्षक अभियंता यांच्या अखत्यारित सेल सुरु होईल. सेलचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता तसेच व्यवस्थापक किंवा उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. नवीन वीज जोडणी, जादा वीजभार या मागणीसह वीजपुरवठा व बिलिंगच्या तक्रारी किंवा प्रश्न मांडण्यासाठी सेलसाठी संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी राहणार आहे. त्याची ग्राहक व संघटनांना कळविण्यात येणार आहे. यासह इतर माध्यमाद्वारे प्राप्त झालेली तक्रार किंवा मागणी ही सेलकडे पाठविली जाईल. त्याद्वारे विनाविलंब कामाला सुरवात होईल.

- महावितरणकडून औद्योगिक वर्गवारीच्या दरवर्षी सुमारे १२०० नवीन वीज जोडण्या देण्यात येतात.- औद्योगिक ग्राहकांचे प्रमाण दरवर्षी सुमारे ३ टक्क्यांनी वाढत आहे.- महावितरणच्या एकूण महसूलात औद्योगिक ग्राहकांचा तब्बल ४६ टक्के वाटा आहे.

नवीन वीज जोडणी किंवा वाढीव वीजभारसंबंधी मागणी नोंदविल्यानंतर काय होणार ?- ग्राहकांशी संपर्क साधून कागदपत्रे, शुल्काची माहिती दिली जाईल.- दोन दिवसांत कागदपत्रांची पुर्तता, ऑनलाइन अर्ज व प्रक्रिया शुल्क भरण्याची कार्यवाही महावितरणकडून ग्राहकांच्या दारी जाऊन केली जाईल.- स्थळ पाहणीच्या तांत्रिक अहवालानुसार फर्म कोटेशन देण्यासह वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु होईल.

टॅग्स :महावितरणवीज