Join us

नवीन नाटकांनी नववर्षाचे स्वागत! दामले-बेर्डेंच्या नाटकांची उत्सुकता; मांजरेकरांच्या 'फिल्टर कॅाफी'चे कुतूहल

By संजय घावरे | Published: December 10, 2023 6:22 AM

सध्या फुल टू फॅार्ममध्ये असणारी नाट्यसृष्टी नववर्षाचे स्वागत नवीन नाटकांनी करणार आहे.

मुंबई - २०२३च्या अखेरच्या काळात मराठी रंगभूमीवर आलेली नवीन नाटके रसिकांचे मनोरंजन करत आहेत. सरत्या वर्षाला 'गुडबाय' आणि नवीन वर्षाला 'वेलकम' म्हणण्यासाठी नाट्यसृष्टीही सज्ज झाली आहे. सध्या फुल टू फॅार्ममध्ये असणारी नाट्यसृष्टी नववर्षाचे स्वागत नवीन नाटकांनी करणार आहे.

२४ नोव्हेंबर या एकाच दिवशी '२१७ पद्मिनी धाम' आणि 'मर्डरवाले कुलकर्णी' हि दोन नवी नाटके रसिकांच्या भेटीला आली. १ डिसेंबरला ८१८वा प्रयोग सादर करत 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे मूळ नाटक सौरभ गोखलेने साकारलेल्या नथुरामसह पुन्हा रंगभूमीवर आले आहे. विजय केंकरे दिग्दर्शित आणि मधुरा वेलणकर, तुषार दळवी, विक्रम गायकवाड, श्रुती पाटील अभिनीत 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकाचा आज शुभारंभाचा प्रयोग आहे. नवीन वर्षात चार नाटके रंगभूमीवर येणार आहेत. यात प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे, महेश मांजरेकर आणि अस्मय थिएटर्स यांच्या नाटकांचा समावेश आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे लोकनाट्यसदृश व्यावसायिक नाटकाच्या तयारीत व्यग्र आहेत. हे नाटक जानेवारीत येणार आहे. औरंगाबादचे प्रदीप आडगावकर यांनी लिहिलेल्या या नाटकात गणेश चंदनशिवे अॅकडमी, अॅकॅडमी आॅफ थिएटर आर्टस, ललित कला केंद्र या कलाकार घडवणाऱ्या संस्थांमधील मुलांना काम करण्याची संधी मिळणार आहे. अष्टविनायक प्रकाशित या नाटकाचे सूत्रधार दिलीप जाधव असून, अॅकॅडमी आॅफ सिनेमा अँड थिएटर आणि स्नेह-प्रदीप यांची निर्मिती आहे. दिग्दर्शनासह संगीत दिग्दर्शन आणि सेटिंग पुरुषोत्तम बेर्डे करणार आहेत. प्रवेश आणि अस्मय थिएटर्सची निर्मिती असलेले 'मास्टर माईंड' हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या नाटकातील कलाकार-तंत्रज्ञांची माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच आहे.

सध्या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या आयोजनाच्या गडबडीत व्यग्र असलेले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामलेही नवीन वर्षात नवं कोरं नाटक घेऊन येणार आहेत. नवीन नाटकाला अजून वेळ असून, सध्या प्राथमिक पातळीवर काम सुरू असलेल्या या नाटकावर कोणतेही भाष्य करता येणार नसल्याची प्रतिक्रिया दामले यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.- पुरुषोत्तम बेर्डे (दिग्दर्शक)

आमच्या नाटकाचे शीर्षक ठरले असून, लवकरच घोषित करण्यात येईल. यात अभिनयाची जाण असलेल्या  २०-२५ नवीन कलाकारांना संधी देण्यात येणार आहे. १५ डिसेंबरपासून तालीम सुरू होईल. यात महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातील गोष्ट आहे. अतिशय प्रतिभावान आणि सुशिक्षीत माणसाचे हे आत्मसंवेदन आहे. यासोबत साहित्य, काव्य, नाट्य, नृत्य, संगीत आणि महाराष्ट्राच्या मातीतील संस्कृती पाहायला मिळेल.