वसई : नोबल पुरस्कारविजेत्या भारतरत्न मदर तेरेसा यांना उद्या रविवार, ४ सप्टेंबर रोजी व्हॅटिकन येथे ‘संतपद’ बहाल करण्यात येणार असल्याबद्दल वसईकरांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.तब्बल ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८६ साली मदर तेरेसा वसईत आल्या होत्या. तेरेसा यांनी वसई-पापडी येथील कृपा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली होती. त्या वेळच्या त्यांच्या आठवणींना तेथील विविध चर्चमध्ये उजाळा दिला जात आहे. विशेष म्हणजे व्हॅटिकनमध्ये होणाऱ्या खास मिस्साविधीत भारतातून एकमेव प्रतिनिधी म्हणून वसईतील फादर जे. परेरा यांना सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. संतपद बहाल करण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर वसई-विरार परिसरातील अनेक चर्च आणि शाळांमध्ये प्रार्थनेच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विरार येथे संत मदर तेरेसा यांच्या नावाने नवीन चर्च बांधण्यात आले असून त्याचेही उद्घाटन उद्याच (रविवारी) केले जाणार आहे. या चर्चमध्ये सेलिब्रेशनची जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रातून १०० धर्मगुरू येणार आहेत, तर पाच हजार भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फादर फिलीप वाझ यांनी दिली. (प्रतिनिधी) एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या मदर तेरेसा यांनी १८ व्या वर्षी जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी झोकून दिले. तेरेसा १९२९ साली भारतात आल्या. त्यानंतर, १९४८ सालापासून कोलकात्यात त्यांनी समाजकार्याला वाहून घेतले. नोबल पारितोषिक आणि भारत सरकारचा सर्वोत्तम भारतरत्न पुरस्कार तेरेसा यांना बहाल करण्यात आला.
वसईत आनंदोत्सव, जल्लोषाने स्वागत
By admin | Published: September 04, 2016 3:09 AM