मुंबई : बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून, वरुणराजाही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर झाला आहे. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या आगमन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरुणराजाने अवघी मुंबई मान्सूनमय केली असून, शुक्रवारी सकाळपासून मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरात धो धो कोसळत असलेल्या जलधारांत श्रीगणेशाचे आगमन सोहळे रंगत आहेत.मुंबापुरीवर कोरोनाचे सावट असले तरीही गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. गुरुवारप्रमाणेच शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा मुंबईच्या बाजारपेठांत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी झाल्याचे निदर्शनास आले. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही श्रीगणेशाच्या यथासांग पूजाअर्चेसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडले होते. बहुतांश गणेशमूर्ती कार्यशाळेतून घरांसह सार्वजनिक मंडपांकडे रवाना होत असल्याचे चित्र असतानाच पावसाचा जोर तितकाच वाढत होता.>विशेषत: सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत पावसाने धूमशान घातले होते. हवामान खात्याने १० वाजता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांसाठी ३ तासांकरिता मुसळधारेचा इशारा दिला होता. तो खरा ठरला. मुंबईत अनेक ठिकाणी तुरळक जोरदार सरी कोसळल्या. दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. सायंकाळी मात्र त्याने पुन्हा हजेरी लावली.
विघ्नविनाशक गणरायाचे स्वागत वरुणराजाच्या जलाभिषेकाने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 3:23 AM