आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये - सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 05:27 AM2020-11-04T05:27:03+5:302020-11-04T05:27:30+5:30

Subhash Desai : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठी राज्य मराठी  विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Welcoming modern technology should not be considered secondary - Subhash Desai | आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये - सुभाष देसाई

आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये - सुभाष देसाई

Next

मुंबई : शैक्षणिक क्षेत्रात जरी डिजिटल युग आले असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये, असे आवाहन राज्याचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी केले. 
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठी राज्य मराठी  विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या स्पर्धेचे ऑनलाइन उदघाटन करण्यात आले. यावेळी देसाई म्हणाले की, गणिताची गोडी वाढविण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. आपल्या जीवनात अंक आणि नाद अपरिहार्य आहे. पूर्वी प्रार्थना, परवचे, पाढे होत असत. मुलांना ही सवय होती. तेव्हाच्या जीवनात सूर, ताल साथ करीत असत. कवितेचे, गणिताचे नाद आणि तालाचा पाठिंबा असायचा. आता किती शाळांत पाढे म्हणून घेतले जातात? शैक्षणिक विश्व डिजिटल झाले आहे. आधुनिक तंत्राचे स्वागत करताना पारंपरिक पाढे विसरू नयेत. जुन्या पिढीला निमकी, अडीचकी, पावकीची परीक्षा असायची. पाठांतराची परंपरा अभ्यासातून कमी झाली तरी पाठांतराला दुय्यम लेखता कामा नये. हिशेब करताना या पाठांतराचा फायदा व्हायचा. जुनेपणाचा शिक्का मारून पाढे दूर लोटू नका, असे देसाई म्हणाले.
या पाढे स्पर्धेसाठी  ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पाठांतराचे व्हिडीओ अपलोड करता येतील. १ ते १५ जानेवारीपर्यंत परीक्षण होईल. १५ जानेवारीला जिल्हास्तर निकाल जाहीर केला जाईल. ११ हजार, ७ हजार, ५ हजार अशी पारितोषिके असणार आहेत. बालगट (वयोगट - ४ ते ६) पहिलीसाठी अंक उच्चार १ ते १०० असा स्पर्धेचा विषय आहे. दुसरी, तिसरीसाठी  १ ते १० पाढे, ११ ते २० पाढे,  २१ ते ३० पाढे असा स्पर्धेचा विषय आहे. चौथी, पाचवीसाठी पावकी, निमकी असा स्पर्धेचा विषय आहे. सहावी, सातवीसाठी पाऊणकी, सवायकी असा स्पर्धेचा विषय आहे तर आठवी, नववी, दहावीसाठी दीडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे. खुल्या गटामध्ये पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दीडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे.

Web Title: Welcoming modern technology should not be considered secondary - Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.