फेरीवाल्यांचा कल्याण बंद!

By admin | Published: September 2, 2016 03:49 AM2016-09-02T03:49:02+5:302016-09-02T03:49:49+5:30

केडीएमसी प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी फेरीवाला संघर्ष समितीने महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी फेरीवाला संघटनांच्या

The welfare of hawkers stopped! | फेरीवाल्यांचा कल्याण बंद!

फेरीवाल्यांचा कल्याण बंद!

Next

कल्याण : केडीएमसी प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी फेरीवाला संघर्ष समितीने महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी फेरीवाला संघटनांच्या नेत्यांनी विशेष करून शिवसेनेचे पदाधिकारी असलेले अरविंद मोरे यांनी थेट महापौरांवर हल्लाबोल केल्याने सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर मिळाला आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करता फेरीवाल्यांवर कारवाईचा आदेश देणारे महापौर हे पदासाठी लायक नाहीत, अशी प्रखर टीकाही यावेळी करण्यात आली. ही कारवाई अशीच सुरू राहिल्यास शुक्रवारपासून कल्याण बंदची हाक दिली जाईल, असा इशारा फेरीवाला संघटनांनी दिला.
फेरीवाल्यांवर सध्या सुरू असलेल्या कारवाईविरोधात फेरीवाला संघटना आक्रमक झाल्या आहेत. बुधवारी बहुजन फळभाजी विक्रे ता संघटनेने महापालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्यानंतर, गुरुवारी फेरीवाला संघर्ष समितीने आंदोलन केले. त्यात शहरातील चार फेरीवाला संघटना सहभागी झाल्या होत्या. याचे नेतृत्व संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी केले. यात प्रशांत माळी, संजय जाधव आणि रमेश हनुमंते हे अन्य संघटनांचे अध्यक्षही सहभागी झाले होते. सर्वच संघटनांच्या नेत्यांनी यावेळी केलेल्या भाषणात महापौरांना लक्ष्य केले. आम्हाला कोणीही कायदा शिकवू नये, प्रथम फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करताना त्यांनी महापौरांनी घेतलेल्या कारवाईच्या निर्णयाचा निषेध केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच सामान्य माणसांसाठी झटले, परंतु महापौरांनी सामान्य अशा फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आणली आहे.
सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान सुरू आहे. महापौर हे पदाला लायक नाहीत, अशी टीका मोरे यांनी केली. महापालिकेतील १२२ नगरसेवकांनी शपथ घेऊन सांगावे की, आम्ही भ्रष्टाचार करीत नाही, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
स्कायवॉकवरील फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी, ही आमचीही मागणी आहे. परंतु, त्यांच्यासाठी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्यांना का लक्ष्य केले जातेय, असा सवाल त्यांनी केला. मनसेने फेरीवाल्यांवर कारवाईसाठी उपोषण छेडले आहे. मराठी माणसांवर उपासमारीची वेळ आणणे, हेच राज ठाकरे यांचे नवनिर्माण का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सध्या सुरू असलेली कारवाई ही अन्यायकारक आहे. ती सुरू राहिल्यास शुक्रवारपासून कल्याण शहर बंदची हाक दिली जाईल. त्यानंतही परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली तर रास्ता रोको केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, आयुक्त ई. रवींद्रन हे कामानिमित्त बाहेर गेल्याने ते मुख्यालयात उपस्थित नव्हते. अतिरिक्त आयुक्त संजय घरत हे शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारतील, असे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. परंतु, आयुक्तांनाच निवेदन देण्यावर ते ठाम राहिले. अखेर, मोर्चा स्थगित करून त्यांनी शिवाजी चौकात ठिय्या मांडला. (प्रतिनिधी)

महापौरांना लक्ष्य करणे पडणार महागात
थेट स्वपक्षाच्या महापौरांना लक्ष्य करणे मोरे यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

मोरे रुग्णालयात दाखल
आयुक्त न भेटल्याने फेरीवाल्यांनी शिवाजी चौकात ठिय्या मांडला. तेथे संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले.

Web Title: The welfare of hawkers stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.