Join us

शाब्बास... अवघ्या सहा दिवसांत २८ लाख घरांचे सर्वेक्षण! पाच लाख घरे बंद, अडीच लाख लोकांचा माहिती देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:54 AM

Mumbai News: मराठा सर्वेक्षणासाठी पालिकेने कंबर कसली असून, सहा दिवसांत पालिका अधिकाऱ्यांकडून २८ लाख ७ हजार ५१८ म्हणजेच ७२.३८ टक्के घरे पालथी घातली आहेत. यामधील १९ लाख ६६ हजार ९२६ घरांचे सर्वेक्षण माहितीसह करण्यात आले.

 मुंबई - मराठा सर्वेक्षणासाठी पालिकेने कंबर कसली असून, सहा दिवसांत पालिका अधिकाऱ्यांकडून २८ लाख ७ हजार ५१८ म्हणजेच ७२.३८ टक्के घरे पालथी घातली आहेत. यामधील १९ लाख ६६ हजार ९२६ घरांचे सर्वेक्षण माहितीसह करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना जवळपास ५ लाख ७० हजार घरे बंद मिळाली आहेत तर जवळपास २ लाख ६९ हजार लोकांनी सर्वेक्षणास नकार दिला आहे. सलग सुट्यांमुळे बंद असलेल्या घरातील सर्वेक्षणासाठी पालिका कर्मचारी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहेत.

मुंबईत ३८ लाख घरे असून, पहिल्याच दिवशी दोन लाख ६५ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र, त्यानंतर सलग सुट्यांमुळे मुंबईतील अनेक कुटुंबे घरी नसल्याने निदर्शनास आले आहे. तर काही ठिकाणी घरात माहिती देणारे 

तरुण सदस्य नाहीत, कुठे सोसायट्यांमध्ये प्रवेश दिला जात नाही, प्रगणकाचा मोबाइल क्रमांक रजिस्टर नाही, अशा समस्यांना तोंड देत ६ दिवसांत पालिका कर्मचाऱ्यांकडून ७२ टक्के घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार, हे सर्वेक्षण करण्यात येत असून मुंबईतील गृहनिर्माण संस्था, सोसायट्या यांनी पालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्यास निश्चित वेळेत हे सर्वेक्षण पूर्ण होईल. पालिकेतील ३० हजार कर्मचारी यासाठी सुटीच्या दिवशी ही कार्यरत राहून मेहनत घेत आहेत.-डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका 

टॅग्स :मुंबईमराठा आरक्षण