Join us

रेल्वे स्थानकांवरही आता सुसज्ज सुरक्षा

By admin | Published: November 03, 2015 1:29 AM

मेट्रो आणि मोनो स्थानकात प्रवेश करताच सुरक्षारक्षकांचा असलेला गराडा... प्रत्यक्ष स्थानकात जाताना सुरक्षारक्षकांकडून केली जाणारी कसून तपासणी पाहता सुसज्ज सुरक्षा असल्याचे दिसून येते.

- सुशांत मोरे,  मुंबईमेट्रो आणि मोनो स्थानकात प्रवेश करताच सुरक्षारक्षकांचा असलेला गराडा... प्रत्यक्ष स्थानकात जाताना सुरक्षारक्षकांकडून केली जाणारी कसून तपासणी पाहता सुसज्ज सुरक्षा असल्याचे दिसून येते. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर अशाच प्रकारच्या सुरक्षेसाठी आता जीआरपीने (गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मेट्रो, मोनो स्थानकांवर महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनची सुरक्षा असून या कॉर्पोरेशनचे ५00 सुरक्षारक्षक जीआरपीला मिळावेत, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षा सुसज्ज होईल आणि जीआरपीलाही त्याची मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानक आणि हद्दीत होणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची तसेच प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही जीआरपीवर आहे. तर रेल्वेतील मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वे सुरक्षा दलावर (आरपीएफ) आहे. जीआरपीकडे सध्या ३,५00 मनुष्यबळ असून त्यांना हे मनुष्यबळ फारच कमी पडत आहे. त्यामुळे रेल्वे आणि हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना त्यांची चांगलीच तारांबळ उडते. त्यांच्या मदतीसाठी ५00 होमगार्डही मंजूर करण्यात आले आहेत. मात्र होमगार्ड ही ऐच्छिक काम करणारी संस्था आहे. त्यामुळे ५00 होमगार्ड मंजूर असूनही २५0 ते ३00 होमगार्डच रेल्वे स्थानकांवर जीआरपीच्या मदतीला येतात. तसेच या होमगार्डकडून फारशी मदतही जीआरपीला मिळत नाही. एकूणच जीआरपीवर पडणारा कामाचा ताण पाहता त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे ५00 सुरक्षारक्षक मिळावेत, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर शासनाकडून सकारात्मक विचारही केला जात आहे. सध्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनची सुरक्षा ही मेट्रो आणि मोनो रेल्वेलाही पुरविली जात आहे. मेट्रो स्थानकांच्या सुरक्षेसाठी ७३0 सुरक्षारक्षक तर मोनोसाठी ५५0 सुरक्षारक्षक तैनात आहेत. या सशस्त्र सुरक्षारक्षकांकडून आतापर्यंत मेट्रो आणि मोनोची सुरक्षा उत्तमरित्या सांभाळण्यात आली आहे. याबरोबरच डॉग्ज स्क्वॉड, डोअर मेटल डिटेक्टर अशी यंत्रणाही त्यांच्याकडे आहे.लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही जीआरपीवर आहे. सध्या महिला डब्यातील प्रवाशांची सुरक्षा ही रात्री साडेआठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत केली जाते. मात्र लाखो महिला प्रवाशांची सुरक्षा करणाऱ्या जीआरपीला गेल्या काही वर्षांपासून मनुष्यबळ कमी पडत आहे. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी ही सध्या ६00 रेल्वे पोलीसच (जीआरपी) पार पाडत आहेत. महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनची सुरक्षा मिळाल्यास महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांचीही मदत घेतली जाणार आहे. मेट्रोत सध्या अकरा स्थानके असून या स्थानकांवर ७०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तर ७३० सुरक्षारक्षक नेमण्यात आले असून सोबतीला प्रत्येक स्टेशनवर सहा डॉग्ज स्क्वॉड असे ७२ डॉग्ज स्क्वॉड, डोअर मेटल डिटेक्टर आणि सुरक्षारक्षकांकडे हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर देण्यात आले आहेत. मोनो रेल्वेवर सध्या ५५० सुरक्षारक्षक असून सीसीटीव्ही ५०० पेक्षा अधिक आहेत. १३२ धोकादायक संवेदनशील ठिकाणेछेडछाडीचे, लोकलच्या टपावरून प्रवास करणारे, चेन आणि पाकीटमारी करणारे, दोन स्थानकांदरम्यान लोकलच्या दरवाजाजवळ डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर हल्ले करणारी ठिकाणे जीआरपीकडून शोधण्यात आली आहेत. अशी १३२ धोकादायक संवेदनशील ठिकाणे आहेत. यात ७६ मध्य रेल्वे मार्गावर आणि ५६ पश्चिम रेल्वेमार्गावरील ठिकाणे आहेत.आमच्या मदतीला ५00 होमगार्ड देण्यात आले आहेत. परंतु मंजूर होमगार्डपैकी फक्त २५0 ते ३00 होमगार्डच स्थानकांवर असतात. त्यामुळे प्रवाशांच्या आणि खासकरून महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे ५00 सुरक्षारक्षक देण्यात यावेत, असा प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. - मधुकर पाण्डेय (पोलीस आयुक्त, लोहमार्ग)