दहिसर : दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा सर्कल येथे असलेल्या जुन्या पडीक विहिरीमुळे परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. एकतर ही विहीर कायमची बुजवा किंवा तिचा पुनर्विकास तरी करा, अशी मागणी रहिवासी करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कांदरपाडा सर्कलला असलेली ही जुनी विहीर पडीक झाली आहे. विहिरीचे सगळे कठडे तुटून पडले आहेत. या विहिरीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे विहिरीची दुरवस्था झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विहीर दुर्लक्षित व उघडी असल्यामुळे विहिरीत प्रचंड प्रमाणात कचरा साठल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाणही कमालीचे वाढल्याने शेजारी असलेल्या इमारतीतील रहिवाशांना दिवसाही खिडकीची दारे बंदच ठेवावी लागतात. या विहिरीसंदर्भात स्थानिकांनी अनेकदा पालिकेत तक्रार दिली आहे. मात्र, ही विहीर पालिकेच्या मालकीची नसल्याचे कारण सांगून पालिका जबाबदारी झटकून टाकत आहे. शिवाय मूळ मालकाची माहिती नसल्याने विहिरीचे नूतनीकरण करणेही कठीण होत असल्याचे उत्तर पालिका अधिकारी देऊन मोकळे होत आहेत. दरम्यान, एका स्थानिक रहिवाशाने विहिरीचे नूतनीकरण करण्याची तयारी दर्शवली. पण त्याने १० वर्षे विहिरीचे पाणी वापरण्याची परवानगी पालिकेकडे मागितली. पालिका मात्र अशी परवानगी देण्यास तयार नाही. त्यामुळे हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही विहीर पडीक असल्यामुळे नूतनीकरण करताना ती कोसळण्याची शक्यता आहे. जर विहीर कोसळली व कामगारांना काही इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण? या पेचात पालिका सापडली आहे. (प्रतिनिधी)
विहीर ठरतेय डोकेदुखी
By admin | Published: September 10, 2014 1:42 AM