विहीरी, स्मशानभूमी अपूर्णच
By admin | Published: December 2, 2014 11:00 PM2014-12-02T23:00:02+5:302014-12-02T23:00:02+5:30
जव्हार तालुक्यातील चांभारशेत येथील मनरेगा योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराची साखळी हनुमानाच्या शेपटीसारखी वाढतच चालली आहे.
हितेन नाईक, पालघर
जव्हार तालुक्यातील चांभारशेत येथील मनरेगा योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराची साखळी हनुमानाच्या शेपटीसारखी वाढतच चालली आहे. विक्रमगड तालुक्यातील कासा बुदु्रक ग्रामपंचायतच्या रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरी खोदणे, स्मशानभूमी, नर्सरी इ. साठी लाखो रू. चे वाटप करण्यात आले असून तीन वर्षापासून विहीरी, स्मशानभुमीची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या कॅन्सरपासून प्रशासनाला मुक्त करण्याचे आव्हान आदिवासी मंत्री विष्णु सावरा, खा. वनगा व जिल्हाधिकाऱ्यांना पेलावे लागणार आहे.
जव्हारच्या वावर वांगणी मधील कुपोषणाच्या बळीची दाहकता कमी व्हावी व रोजगाराच्या शोधार्थ होणारी स्थलांतरे रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अस्तित्वात आली. परंतु जव्हारच्या चांभारशेत, खरोडा इ. भागातील वनविभाग, कृषीविभाग इ. च्या कामात झालेल्या लाखो रू. च्या भ्रष्टाचाराची साखळी विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या अनेक पाड्यापाड्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारात गुंतलेल्यांच्या विरोधात प्रशासन काय कठोर पावले उचलते याकडे सर्व बाधीत कुटुंबाचे लक्ष लागुन राहीले आहे.
कासा बुदु्रक ग्रा. पं. हद्दीतील तुंबडपाडा येथील सोनजी श्रावण तुंबडा या ६५ वर्षीय शेतकऱ्याच्या शेतात सन २०११-१२ मध्ये विहीरीचे काम हाती घेण्यात आले. याकामी ८५ हजाराचा खर्च मंजूर रक्कमेपैकी करण्यात आल्याचे तुंंबडा यांनी लोकमतला सांगितले. परंतु आजही विहीरीच्या जागी फक्त खड्डा खणण्यात आला असून व १ ट्रक रेती ३ वर्षापासून शेजारी पडून आहे व या कामाचे सर्व पैसे देण्यात आल्याचे समजते.
डोंगरशेत येथे प्रत्येक वर्षी मार्च ते जून या चार महिन्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने महिलांना ३ ते ४ कि. मी. अंतरावरून पाणी आणावे लागते. अशावेळी अर्जुन वाका तेलवडे यांना मंजूर झालेली विहिर पूर्ण झाल्यानंतर गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशा भाबड्या आशेवर ग्रामस्थ होते. त्यांची सन २०११-१२ साली मंजूर झालेली विहीर १९ फुटपर्यंत खोदून अपूर्णावस्थेतच आहे. रेती, डंपर बाजुला पडून आहे. या विहिरीच्या खोदाईपोटी मजुरीचे तीस हजार देण्याचा तगादा मजुरानी लावला असून आपल्या हातात या कामापोटी एक छदामही पडला नसल्याचे तेलवडे यांनी सांगितले. या खड्ड्यातील पाण्यावर सध्या गुरेढोऱ्यांचा ताबा आहे.
सोरशेत येथील रविंद्र नाना सहारे व तुंबडपाडा येथील रामु सहारे यांच्या विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असले तरी ब्लास्टींग, मजूरी, गवंडी इ. चे पैसे लाभार्थ्यांनीच भरल्याने ते संकटात सापडले असून मंजूर कामाचे पैसे मिळण्याची दोन वर्षापासून ते वाट पाहत आहेत.
वाघपाडा येथील स्मशानभूमीसाठी ठेकदार संजय वाघ याला साठ हजार रू. अदा करूनही स्मशानभूमीचा फक्त पाया दोन वर्षापासून उभा आहे. ठेकेदाराला तीनवेळा नोटीसा बजावण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून वाघपाडा येथील कृष्णा गवळी या तरूणाने हजारो रू. कर्ज काढून आपल्या शेतात नर्सरी उभी केली. परंतु ग्रामविकास अधिकाऱ्याने नर्सरी मधील झाडे खरेदी करण्यास नकार दिल्याने त्या नर्सरीतील सर्व जगवलेली रोपे मरू लागली आहेत व सदर शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे.
योजनामधील अनेक भ्रष्टाचाराची उदाहरणे विक्रमगड तालुक्याच्या गावपाड्यात दिसून येत आहेत. अशा भ्रष्टाचाराचा विरोधात आवाज उठविणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न कासा बुदु्रक भागात केला जातो आहे.