- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जोगेश्वरी पश्चिम परिसरात असलेल्या एका गोठ्याजवळील विहिरीत, सात वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी शुक्रवारी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, यश जितेंद्र यादव असे मृत मुलाचे नाव आहे.जोगेश्वरी पश्चिमच्या आर. सी. पटेल चाळ, ख्वाजा जमात खानाच्या पाठीमागे म्हशीचे गोठे आहेत. या गोठ्याजवळ विहीर असून, पावसामुळे तुडुंब भरली आहे. ही विहीर जवळपास ३० ते ३५ फूट खोल आहे. या विहिरीवर एक चार फुटांचा कठडा बांधण्यात आला आहे. यश सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याचा भाऊ सौरभ याच्याबरोबर या ठिकाणी खेळायला गेला होता. सौरभ त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावू लागला, ज्याला हुलकावणी देण्यासाठी यश विहिरीवरील कठड्यावर उभा राहिला. खेळता-खेळता त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने, तो गटांगळ्या खाऊ लागला. सौरभने तत्काळ याची माहिती आरडाओरडा करत, घरच्यांना आणि स्थानिकांना दिली. स्थानिकांनीही विहिरीकडे धाव घेतली. मात्र, तोवर यश बुडाला होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, पालिकेचे पाणबुडे विहिरीत यशला शोधण्यासाठी उतरले. दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेला हा शोध अडीचच्या सुमारास संपला. यशला गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने त्याला तपासून मृत घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, यशचा भाऊ सौरभ हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी आहे. त्याने यश हा पाय घसरून पडल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे यात कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही. आम्ही या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी सांगितले.
जोगेश्वरीच्या विहिरीत मुलगा बुडाला
By admin | Published: July 09, 2017 2:28 AM