Join us

देवनारच्या दत्तगुरू सोसायटीजवळील विहीर बनली मद्यपी, टवाळखोरांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:06 AM

मुंबई : देवनार व्हिलेज मार्गावरील दत्तगुरू सोसायटी येथील बंगल्यांना लागून असणाऱ्या विहिरीजवळ मद्यपी व टवाळखोरांचा अड्डा बनला आहे. या ...

मुंबई : देवनार व्हिलेज मार्गावरील दत्तगुरू सोसायटी येथील बंगल्यांना लागून असणाऱ्या विहिरीजवळ मद्यपी व टवाळखोरांचा अड्डा बनला आहे. या बेवारस विहिरीत दररोज पोहण्याच्या बहाण्याने दररोज ६० ते ७० टवाळखोर मुल येतात व दिवसभर प्रचंड धिंगाणा घालतात. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, विवस्त्र अवस्थेत दिवसभर राहणे, बीभत्स हातवारे, अमली पदार्थाचे सेवन, दारूचे सेवन, धूम्रपान या गैरकृत्यांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.

दत्तगुरू सोसायटी संकुलात एकूण १५२ बंगले असून, सोसायटीच्या काही बंगल्यांच्या बाजूने मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. तसेच कोणतीच सुरक्षा यंत्रणा देखील नाही. त्यामुळे त्या बाजूने सोसायटीच्या आत शिरून चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. याच विहिरीत दोन वर्षांपूर्वी बेवारस अवस्थेत एक मृतदेहसुद्धा सापडला होता. त्यामुळे ही मोकळी जागा गुन्हेगारांचा अड्डा बनू लागली आहे.

कोरोनाच्या काळात सर्वांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि विद्यार्थीसुद्धा ऑनलाईन माध्यमातून शिकत आहेत. मात्र, दिवसभर सुरू असणाऱ्या गोंधळामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रासले आहेत. येथे येणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.