विहिरींचा कोंडतोय श्वास, दहा वर्षांत मुंबईतील ७ हजार विहिरी गायब
By Admin | Published: April 11, 2016 01:50 AM2016-04-11T01:50:37+5:302016-04-11T03:22:58+5:30
शहर-उपनगरातील पुनर्विकास प्रकल्पांमुळे विहिरींचा श्वास कोंडत आहे. पाणी प्रश्नांवर स्थिती बिकट बनलेली असताना ‘लोकमत’ने नैसर्गिक जलस्रोत असलेल्या विहिरींचा आढावा घेतला.
मनीषा म्हात्रे, मुंबई
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नैसर्गिक जलस्रोत टिकविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जिवंत विहिरींचाच जीव घोटला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या १० वर्षांत तब्बल ७ हजार १५३ विहिरी गायब झाल्याची धक्कादायक बाब महापालिकेच्याच आकडेवारीतून उघड झाली आहे.
एकेकाळी मुंबईतील या विहिरीच नागरिकांसाठी आधार ठरायच्या. पिण्यापासून घरगुती कामांसाठी याच पाण्याचा वापर होत असे. मुंबईतील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. २००९मध्येही अशी ‘पाणीबाणी’ निर्माण झाली होती. त्या वेळी महापालिकेने १ हजार २३५ विहिरींची दुरुस्ती आणि स्वच्छता करून पाणीउपसा करण्यासाठी पंपही बसवले होते. पैकी ९७१ विहिरींची दुरुस्ती व स्वच्छता करण्यातही आली. यासाठी तब्बल २९ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या विहिरींची स्वच्छता, पुनर्बांधणी केल्यास हे पाणी बागकाम, वाहने धुणे, बांधकामे व अन्य वापरासाठी करता येईल, हा उद्देश होता. मात्र त्या प्रयत्नानंतर पालिकेचे या विहिरींकडे दुर्लक्षच झाले.
शहर-उपनगरातील पुनर्विकास प्रकल्पांमुळे विहिरींचा श्वास कोंडत आहे. पाणी प्रश्नांवर स्थिती बिकट बनलेली असताना ‘लोकमत’ने नैसर्गिक जलस्रोत असलेल्या विहिरींचा आढावा घेतला. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, पवई, विलेपार्ले परिसरात चाळ संस्कृतीत क्वचितच विहिरी दिसून आल्या. अनेक विहिरींना कचराकुंडी-गटाराचे स्वरूप आलेले दिसून आले. काही विहिरींवर चक्क शाळा, रस्ते उभारून त्यांचे अस्तित्वच मिटवले गेले असून, अनेक विहिरी केवळ कागदावरच शिल्लक असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले. पालिका प्रशासन मात्र सातत्याने या जलस्रोतांकडे कानाडोळा करीत आहे.
५० वर्षे जुन्या असलेल्या येथील सार्वजनिक विहिरीचा वापर शेकडो कुटुंबे करत होती. कालांतराने येथील लोकसंख्या वाढली. त्यामुळे नाल्यांबरोबरच डे्रनेज लाइनही वाढल्या. त्यामुळे नाल्याचे पाणी या विहिरीत झिरपू लागले. नैसर्गिक जलस्रोतांत हे पाणी मिसळत असल्याने नागरिकांनी त्याचा वापर करणे टाळले. पाणी समस्या भेडसावताना पुन्हा या विहिरीतील पाण्याचा वापर करण्याचा स्थानिकांचा मानस आहे. एकीकडे नळ आहेत पण त्याला पाणी नाही तर दुसरीकडे विहिरीत पाणी आहे पण ते वापरण्याजोगे नाही, अशा वेळी काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर सध्या आहे. चंद्राबाई आश्रम चाळ, शिवाजी नगर, विलेपार्ले
४० वर्षे जुन्या असलेल्या या विहिरीचा वापर पूर्वी मोठ्या प्रमाणात केला जात होता. जवळपास १०० कुटुंबांची लोकवस्ती असलेल्या या विहिरीचा वापर कालांतराने कमी होत गेला. त्यामध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने या विहिरीवर लोखंडी जाळी बसविण्यात आली. नारायण पटेल बाग, शिवाजी नगर, विलेपार्ले
येथील विहीर ५० वर्षे जुनी आहे. विहीर मोकळी असल्याने या ठिकाणी आत्महत्येची घटना घडली होती. या घटनेनंतर विहिरीचा दुरुपयोग होत असल्याने पालिकेच्या मदतीने विहिरीवर लोखंडी जाळी बसविण्यात आली. त्यानंतर विहीर कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रामा यादव चाळ,
आझादनगर, भांडुप
गेली ६० वर्षे जुन्या असलेल्या या सार्वजनिक विहिरीला सध्या कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जवळपास २५० कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत. पहाटे ५ ते ९ या वेळेत या ठिकाणी पाणी येते. पाणीप्रश्न भेडसावत असताना स्थानिकांनी नगरसेवकाकडे या विहिरीच्या दुरुस्तीबाबत धाव घेतली. नगरसेवकाने काही वर्षांपूर्वी यावर लोखंडी आवरण घालण्याचा घाट घातला. या विहिरीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांना याचा फटका बसताना दिसत आहे. रेल्वे चाळ,
विक्रोळी पश्चिम
येथील सर्वजनिक विहीर गेली ४० वर्षे जुनी असून, ३० ते ३५ फूट खोल आहे. स्थानिक नागरिक याची स्वच्छता ठेवत असल्यामुळे इतर विहिरींच्या तुलनेत या विहिरीची अवस्था थोडी बरी दिसून आली. स्थानिकांच्या पाठपुराव्यामुळे येथील विहिरीतील पाण्याचा वापर सध्या केला जात आहे. मात्र प्रशासनाकडूनही याची दखल घेणे गरजेचे असल्याचे स्थानिक भारती चव्हाण यांनी सांगितले. शिवशक्ती चाळ, पाटकर कम्पाउंड, तुलशेत पाडा, भांडुप
पाटकर कम्पाउंडमध्ये असलेल्या सार्वजनिक विहिरीच्या ठिकाणी आता शाळा उभी आहे. या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. पाटकर यांच्या मालकीच्या असलेल्या या जागेतील ही विहीर जवळपास ६० वर्षे जुनी होती. विहिरीच्या जागेचा परस्पर व्यवहार होऊन ७ वर्षांपासून या ठिकाणी शाळा सुरू असल्याचे स्थानिक काशिनाथ पाटकर यांनी सांगितले. त्यामुळे पूर्वी पाटकर कम्पाउंडच्या प्रवेशद्वारालगतच असलेली ही विहीर आता शोधूनही सापडणार नाही.अग्रवाल कम्पाउंड, भांडुप
येथील विहीर आता केवळ पालिकेच्या कागदावर शिल्लक आहे. गेल्या पाच वर्षांत येथील विहीर गायब झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सध्या या विहिरीच्या जागेवर रेतीचा ढिगारा दिसून आला. अनेक भूमाफियांचीदेखील या जागेवर नजर आहे. एकेकाळी या विहिरींचा आधार आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी घ्यायचो. मात्र कालांतराने विहिरींचे अस्तित्वच नष्ट होत चालल्याने या विहिरी इतिहासजमा होणार असल्याचे ७०वर्षीय हमीदा शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दिवसेंदिवस या विहिरी नष्ट होत आहेत. एकेकाळी याच विहिरींचा वापर आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी करायचो. मात्र यातील कचऱ्यामुळे या विहिरींची अवस्था बिकट बनली आहे. त्यामुळे आणखी किती विहिरी नष्ट होण्याची वाट महापालिका प्रशासन पाहत आहे, असा सवाल भांडुप रहिवासी अकबर शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.वाढत्या विस्तारात पालिकेने डे्रनेज आणि मलनि:सारण वाहिन्यांचे नियोजन व्यवस्थित न केल्याने हे पाणी विहिरींकडे ओढले गेले. त्यामुळे भूजलामध्ये प्रदूषण वाढले. विहिरीतील पाणी दूषित झाले. पर्यायी अनेक ठिकाणांच्या विहिरी बुजवल्या. मात्र अशा पद्धतीने जर नैसर्गिक जलस्रोत नष्ट होत गेले तर पुढे आणखी बिकट परिस्थितीला मुंबईकरांना तोंड द्यावे लागेल. त्यासाठी प्रशासनाचे याचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. जेणेकरून या पाण्याचे जलपरीक्षण करून ते दुय्यम वापरासाठी उपयुक्त ठरू शकेल.
- सीताराम शेलार,
समन्वयक, पाणी हक्क समिती