मुंबई : राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनेक कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे हि कामे करण्यासाठी मुंबई बाहेर गेलेले मजूर पुन्हा मुंबईची वाट धरत आहेत. जून महिन्यात एकूण ४ लाख ८१ हजार मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत. मुंबईच्या रेल्वे स्थानकावर दररोज १५ ते २० हजार मजूर दाखल होत आहेत.
राज्यात लॉकडाऊन लागू केल्यावर मजूरांचे काम ठप्प झाले. त्यामुळे मजूर एकाच ठिकाणी अडकून पडले. या मजुरांच्या जेवणाची गैरसोय व्हायला लागली. परिणामी, केंद्र आणि राज्य सरकारद्वारे श्रमिक विशेष ट्रेन १ मेपासून सुरु केल्या. यातून मुंबईहून मजूर आपल्या मूळगावी गेले. यामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहार येथील सर्वाधिक मजूर आपल्या गावी गेले.
राज्यात काही अटी आणि नियम लागू करून अनलॉक केले आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील अनेक व्यवसाय सुरू झाले आहेत. मजूर मूळगावी गेल्याने कामगारांची तीव्र कमतरता लक्षात अनेक व्यावसायिकांना होऊ लागली. व्यावसायिकांनी अधिक वेतन आणि सुरक्षितता देण्याचे सांगत आहेत. मजुरांना मुळगावी रोजगार नसल्याने ते देखील पुन्हा मुंबईच्या वाटेवर आहेत. बांधकाम क्षेत्रातील कुशल, अकुशल कामगार कार्यरत आहेत. ठाणे, पालघर, नाशिक, पुणे परिसरातील एमआयडीसी भागात कुशल-अकुशल मजुरांची कमतरता लक्षात घेता कारखानदारांनी त्यांना परत बोलवत आहेत.
‘मिशन बिगीन अगेन’च्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची आणि खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. काही प्रमाणात खासगी वाहने, टॅक्सी, सलून दुकाने सुरु झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी काम करणारे मजूर पुन्हा मुंबई महानगरात दाखल झाले आहेत.
उत्तरप्रदेशातून १ लाख ९१ हजार ७४१ मजूर, बिहार मधून ८३ हजार ५१५ मजूर, राजस्थानमधून ५८ हजार ३६४ मजूर, पश्चिम बंगालमधून २२ हजार ५६५ मजूर, केरळ मधून १७ हजार २ मजूर, कर्नाटकमधून १९ हजार १०७ मजूर, तेलंगणामधून ११ हजार १७५, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथून ७८ हजार ४२४ मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत. हे १ जून ते २५ जून यादरम्यान ४ लाख ८१ हजार ९८३ मजूर दाखल झाले असून प्रत्येक दिवशी सरासरी १५ ते २० हजार मजूर येत आहेत.