विनामास्क फिरले, दंड म्हणून ४ काेटी भरावे लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:06 AM2021-03-26T04:06:56+5:302021-03-26T04:06:56+5:30
प्रत्येकी २०० रुपयांची वसुली; दंडाच्या रकमेतून पाेलिसांचे ‘कल्याण’ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध पालिकेबरोबर ...
प्रत्येकी २०० रुपयांची वसुली; दंडाच्या रकमेतून पाेलिसांचे ‘कल्याण’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध पालिकेबरोबर पोलिसांकडूनही धडक कारवाई सुरू आहे. गेल्या महिनाभरात २ लाख ३ हजार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ४ कोटी ६ लाखांचा दंड वसूल केला.
मुंबई पोलिसांनी मागील वर्षभरात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ११ हजार ७४२ गुन्हे नोंद केले. त्यानंतर यावर्षी २० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या कारवाईत दंड वसूल करण्यास सुरुवात करण्यात आली. पोलिसांकड़ून गर्दीची ठिकाणे, बाजार, पर्यटनस्थळ, रेल्वे, बसस्थानक तसेच रहिवासी इमारतींसह झोपडपट्टी भागात विनामास्क फिरणाऱ्यांची धरपकड सुरू आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाई सुरू झाल्यापासून आतापर्यंत मुंबई पोलिसांनी २ लाख ३ हजार जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४ कोटी ६ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली. या दंडाची अर्धी रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी देण्यात येईल.
..........