माझे पती आत्महत्या करू शकत नाही...
विमल हिरेन...
माझे पती आत्महत्या करू शकत नाही : विमल हिरेन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, त्यांची पत्नी विमला यांनी पती आत्महत्या करूच शकत नसल्याचे सांगितले. तसेच गुरुवारी नेहमीप्रमाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने बोलावल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडल्याची बातमी कानावर पडल्याचे सांगितले आहे.
त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, आमची स्कॉर्पियो चोरी झाली होती. याबाबत रितसर विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. अशात कार सापडल्यानंतर माझ्या पतीने वेळोवेळी गुन्हे शाखेला सहकार्य केले. त्यांनी जेव्हा जेव्हा बोलावले तेव्हा माझे पती तेथे हजर झाले. गुरुवारीही कांदीवली गुन्हे शाखेतून तावडे नावाच्या व्यक्तीने कॉल करून भेटण्यासाठी घोडबंदर येथे बोलावले. पतीने त्यांना भेटून येतो असे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर रात्री १०नंतर त्यांचा मोबाइल बंद लागला. त्यांचा शोध लागला नाही म्हणून आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली.
मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त चुकीचे आहे. कारण ते कधीच तणावात नव्हते. आयुष्यात असाही दिवस येईल असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तो तावडे कोण?
अशात आता तो तावडे अधिकारी कोण? तो शेवटचा कॉल नेमका कुठल्या अधिकाऱ्याचा होता? त्या भेटीत नेमके काय घडले? ही आत्महत्या की हत्या? असे सवाल उपस्थित होत आहे.
तोंडाभोवती रुमाल
मनसुख यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या तोंडावर खूप सारे रुमाल मिळून आले, त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबतचा संशय आणखीन बळावला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.