समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा सन्मान ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ मुंबई’ या दिमाखदार सोहळ्यात सोमवारी करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रंगलेल्या या कार्यक्रमात मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघर येथील राजकीय नेतृत्वांना ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन ऑफ मुंबई’ या किताबाने गौरविण्यात आले. या वेळी महत्वाच्या राजकीय नेत्यांनी आपला राजकीय प्रवास उलगडला. काहींनी या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या राजकीय विरोधकांचा समाचार घेतला, तर काहींनी एकमेकांना कोपरखळ्या मारत, प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. या सोहळ्याचा थोडक्यात घेतलेला वेध...पक्षकेंद्री विचार महत्त्वाचासंजय गांधी निराधार योजने अंतर्गत ३२ लाख निराधारांना मदत केली. संबंधितांना देण्यात येणारी रक्कम सहाशे रुपये होते. यात वाढ करून ती बाराशे रुपये करण्यात आली. राजकीय समीक्षेविषयी बोलणे टाळतानाच मुनगंटीवार म्हणाले, माणसाचे नाक दाबता येते. तोंड दाबता येते. मात्र कान बंद करता येत नाहीत. त्यामुळे राजकीय समीक्षा अथवा टिकेविषयी जे काही ऐकू येते; ते या कानाने ऐकायचे आणि त्या कानाने सोडून द्यायचे. मुनगंटीवार यांच्या या वाक्यावर सभागृहात जोरदार हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाटही झाला. अर्थ खात्यामधील आकडेवारी गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असते. ही आकडेवारी नेमकी लक्षात राहण्यामागचे रहस्य त्यांना विचारले असता ते म्हणाले, आकडेवारी लक्षात राहणे ही ईश्वराची देणगी आहे. आकडेवारी लक्षात राहिल्याने त्याची मदत मला बैठकांत होते. कारण एखाद्या बैठकीत एखाद्याने चुकीची माहिती अथवा आकडेवारी दिली तर मी तिथल्या तिथे त्यात सुधारणा करतो. आजवरच्या राजकरणाचा विचार केला तर वाद होईल, असे वक्तव्य मी कधी केले नाही. किंवा वाद होईल, अशी कृती मी कधी केली नाही. मला राज्याच्या विकासासाठी काम करायचे आहे. मला वादात पडू देऊ नको; हेच देणे मी ईश्वराकडे मागतो. सुरुवातीपासून मी व्यक्तीकेंद्री नाही तर पक्षकेंद्री आहे. भाजपचा विचार ही माझी आवड आहे. - सुधीर मुनगंटीवार, अर्थ व नियोजन, वन मंत्री
मन विचलित होऊ देत नाहीआपल्या मंत्री पदाच्या कामाबाबत गिरीश महाजन म्हणाले, मंत्री म्हणून काम करताना माझी तत्त्व ठरली आहेत. माझे मन विचलित होत नाही. पक्षप्रवेशाबाबत बोलायचे झाल्यास सत्ता होती तोपर्यंत ठिक होते. मात्र आता सत्ता गेल्यानंतर आमच्या पक्षात प्रवेशासाठी रिघ लागली आहे. आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जलसंपदा विभागात काम करताना अडचणी येतात. मात्र आम्ही त्यावर मात केली आहे, असे सांगत महाजन म्हणाले, यापूर्वी जलसंपदा विभागाकडून काढण्यात येत असलेल्या निविदांमध्ये अनियमितता होती. आम्ही सत्तेत आल्यानंतर ई-टेंडर सुरु केले. महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भातील काम अंतिम करतान कोणतीही नस्ती (फाईल) मंत्रालयापर्यंत मागविली नाही. काम अंतिम करण्याचे अथवा नस्ती अंतिम करण्याचे सर्व अधिकार खालच्या स्तरावर दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकही निविदा ठरवून काढू दिली नाही. ४६ हजार कोटी रुपयांच्या निविदा स्पर्धात्मकरित्या काढल्या. जलसंपदा विभागाच्या कामात पारदर्शकता आणली. नदी जोड प्रकल्प हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न होते. ती त्यांची संकल्पना होती, असा उल्लेख करत महाजन म्हणाले, नद्यांचे पाणी दुष्काळी भागात वळवा; हे त्यांच्या मनात होते. परिणामी आता नदी जोड प्रकल्पाबाबत आम्ही सकारात्मक असून, दुष्काळी भागांना पाणी देण्यावर आमचा अधिकाधिक भर असणार आहे. आणि येत्या विधानसभा निवडणूकीदरम्यान आमचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. - गिरीश महाजन - जलसंपदा मंत्री.संघटनात्मक कामावर भरमी शिक्षणमंत्री झालो आणि माझ्या कामास काही बंधने आली. पक्षीय आदेश पाळत मी माझे काम करत आहे. मी असो किंवा उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे असो; आम्ही दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊस ठेवत आहोत. पक्षात काम करताना स्वत: बद्दल निर्णय घेण्याची मुभा दिली जात नाही. मी संघटनात्मक काम करणारा माणूस आहे. पण याचा अर्थ अआ होत नाही की मी मंत्री म्हणून कमी पडत आहे. १६ जून रोजी मी मंत्री पदाची शपथ घेतली. ६० दिवस भरीव काम करण्याची संधी मिळाली आहे. शाळांना महिन्याला मिळणारा शिष्यवृत्ती २० रुपये होती. मी आता ती ७५० रुपये केली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काचे २० गुण कमी करण्यात आले होते. मात्र मी ते २० गुण त्यांना पुन्हा मिळवून दिले. मैदानी खेळासंदर्भातील ४८ खेळ पुन्हा सुरु करण्यात आले. शाळांना २० अनुदान देत विनाअनुदानित हा शब्द मोडीत काढला. ६० दिवसांत तब्बल ११५ निर्णय घेतले. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे ही भूमिका शिक्षण खात्याची आहे. - अॅड. आशिष शेलार - शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री
मराठा आरक्षण मंजूर होणे अभिमानास्पद१२ नोव्हेंबर २०१४ रोजी मी विधानसभेचा अध्यक्ष झालो. २० वर्षे सभागृहात होतो. ५ वर्षे मंत्री होतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माझी ज्या दिवशी अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याचदिवशी या सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर झाला होता. यावेळी सभागृह सुरळीत चालले याचा अभिमान असून, ही गोष्ट अमेरिकेतील लोकांनी दूरचित्रवाणी संचाद्वारे पाहिली होती. मराठा आरक्षणावर खूप चर्चा झाली. सभागृहात यासंदर्भातील विधेयक जेव्हा मंजूर झाले; तेव्हा सगळे म्हणाले आमचा मराठा आरक्षणास पाठिंबा आहे. माझ्यासाठी या दोन्ही घटना खूप महत्त्वाच्या आहेत. मात्र संसदीय कामाचा ज्यांना खुप अनुभव आहे, अशा लोकांना वेळ देता आला नाही ही खंत आहे. मराठवाड्यात पूर्वीपासून दुष्काळ आहे. दरवर्षी ६५० मिलीमीटर एवढा पाऊस तेथे पडतो. मात्र यावर्षी त्याच्या निम्मादेखील पाऊस झालेला नाही. जलयुक्त शिवारामुळे तेथे शेतात पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो यशस्वी होतो आहे. नदी जोड प्रकल्प राबवित आहोत. ज्या नद्या पश्चिम वाहिन्या आहेत; त्या नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे कसे वळविता येईल? याचा प्रयत्न सुरु आहे. याचा मराठवाड्यास खूप फायदा होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘वॉटर ग्रीड’ मुळे धरणे जोडली जातील. परिणामी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल. - हरीभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष
मतदारांना धन्यवाद : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून माझ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखविला मी आभारी आहे. माझ्यासमोर बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या लोकसभेच्या रिंगणात उमेदवार म्हणून होत्या. मात्र मुंबईकरांनी गोपाळ शेट्टी यास मत दिले; आणि लोकशाहीचा आदर करत योग्य मत दिले. - गोपाळ शेट्टी, खासदार
महाराष्ट्राची विधानसभा एक नंबरसाताºयाचे खासदार उदयन राजे भोसले यांच्याबरोबर समेट का करीत नाहीत? या प्रश्नाला सामोरे जाताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उदायन राजे यांच्याबरोबर माझे कोणतेही राजकीय भांडण नाही. आमचे राजघराणे वेगळे आहे. छत्रपतींसोबत आमचे आठ ते नऊवेळा रोटीभेटीचे व्यवहार झाले आहेत. माझे राजकारणं आता बरेचं पुढे गेले आहे. त्यांचे आता सुरु झाले आहे. त्यांनी छत्रपती राजघरण्यांप्रमाणे वागावे. मी सभापती असून कोणाच्या पक्षात नाही. राजकारणात आता कोणते वेगळे काम मिळायचे आता राहिलेले नाही. ज्याला पुढे जायचे आहे त्याने मार्ग शोधावा, असा टोला त्यांनी लगावला. राज्यासाठी काम करावे, समाजाच्या जाणीवा आणि प्रश्न वेगळे आहेत, त्यांना सांभाळून पुढे न्हावे, असा संदेशही त्यांनी दिला. आपली विधान सभा एक नंबर आहे आणि राहणार, असे ते ठामपणे म्हणाले. मात्र राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते शरद पवार हेच आपले आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. - रामराजे नाईक-निंबाळकर - सभापती, विधान परिषद
देशसेवेतच खरा अभिमान : राजकारणात वाचणारे लोक खूप आहेत. डॉक्टर, वकिल, कलाकार, गायक अशा विविध क्षेत्रातील दिग्गजही राजकारणात आहेत. त्यांच्या क्षेत्रावर त्यांचे प्रभुत्व आहे, असे मत विनायकदादा पाटील यांनी व्यक्त केले. तसेच पक्षांतराचा मौसम सध्या सुरु आहे, राजकीय क्षेत्रात वैचारिक बांधिलकी राहिली नाही का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, पूर्वीची पिढी भारत स्वातंत्र झाला पाहिजे म्हणून लढली, दुसरी म्हणजे माझ्या पिढीतील नेते देशाला मोठे करण्यासाठी काम करीत होते. परंतु आता पक्षाला निवडून देणे म्हणजे सत्तेचा शॉटकर्ट वाटू लागला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. देश सेवा म्हणजे आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करावे, न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही, आपणास जे काम मिळेल ते काम मन लावून करणे म्हणजे देशसेवा होय. सेवेची संधी प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. - विनायकदादा पाटील, माजी आमदारखड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरूसोमवारी मुसळधार पाऊस मुंबई दिवसभर कोसळत होता. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र रस्ते खड्ड्यात गेले असल्याने मुंबईकरांना त्याचा त्रास होत आहे, याबाबत विचारले असता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी, अलीकडे पाऊस खूप पडत आहे. तरीही खड्डे युद्धपातळीवर भरण्याचे काम महापालिका करीत असते, असे सांगितले. वेगवेगळ्या प्राधिकरणाच्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, त्याकडे संबंधित प्राधिकरणाने लक्ष देऊन तत्काळ काम करावे, असे आवाहन त्यांनी केल. - विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई