कोलकात्यातील राड्याला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार - शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:03 PM2019-05-15T12:03:55+5:302019-05-15T12:04:54+5:30
पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते लोकशाहीसाठी दुर्दैव असून कोलकात्यातील या घटनेला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे.
मुंबई - पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते लोकशाहीसाठी दुर्दैव असून कोलकात्यातील या घटनेला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राड्यावर भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमधील हिंसाचार अतिशय दुख:द घटना आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष रोड शो करत असताना काही जणांनी हिंसाचार केला, तोडफोड केली. जाळपोळीची घटना घडली हे लोकशाहीचं दुदैव आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष राज्यात येत असेल तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी तेथील सरकारची असते. मात्र त्या सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्या असं राऊतांनी सांगितले.
कोलकाता येथे झालेल्या राड्यावर भाजपाकडूनही अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. पराभव दिसत असल्याने मतांच्या राजकारणासाठी तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपाच्या रोड शोवर हल्ल्याच्यावेळी पोलिसांना बघ्याची भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगाल वगळता इतर कुठेच हिंसा झालेली नाही असंही अमित शहा यांनी सांगितले.
'भाजपाने तर देशभर निवडणूक लढवलीय; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार दीदींनीच घडवला!' https://t.co/3VJh0N0rih#LokSabhaElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) May 15, 2019
मंगळवारी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीवेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली. अमित शहांचा ट्रक जात असताना त्यावर काठ्या भिरकावल्याने तणाव निर्माण झाला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. कोलकातामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सभास्थळी सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र देऊ न शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले होते. यामुळे भाजपाचे कार्यकर्ते सभा स्थळी जमल्याने त्याठिकाणी तणावाचे वातावरण होते.
सातव्या टप्प्यात लोकसभेच्या उत्ती कोलकाता मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी अमित शहा आले होते आहेत. तसेच याआधीही जय श्री राम म्हणत मी कोलकातामध्ये येत आहे, हिंमत असेल तर ममता यांनी अटक करून दाखवावी असे आव्हान शहा यांनी दिले होतं.