तुफान पावसातही पळणार ‘परे’; पर्जन्यमापकच्या मदतीने होईल वाहतुकीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 12:52 PM2023-05-15T12:52:03+5:302023-05-15T12:53:36+5:30

चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान विविध ठिकाणी १० स्वयंचलित पर्जन्यमापक बसवणे,  मायक्रो टनेलिंगचे काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

Westen railway will run even in stormy rain; Traffic planning will be done with the help of rain gauge | तुफान पावसातही पळणार ‘परे’; पर्जन्यमापकच्या मदतीने होईल वाहतुकीचे नियोजन

तुफान पावसातही पळणार ‘परे’; पर्जन्यमापकच्या मदतीने होईल वाहतुकीचे नियोजन

googlenewsNext

मुंबई : यंदा ७० मिमी प्रतितास पावसातदेखील उपनगरीय रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी  पश्चिम रेल्वेने जोरात तयारी सुरू केली आहे.  चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान विविध ठिकाणी १० स्वयंचलित पर्जन्यमापक बसवणे,  मायक्रो टनेलिंगचे काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे. गेल्या वर्षीपर्यंत प्रतितास २० मिमी पावसात रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू होती.

दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसाने रेल्वे रुळांवर पाणी तुंबून लोकल सेवा विस्कळीत होते. त्यामुळे रेल्वेमार्गावर किती पाऊस पडतो याचा अंदाज घेण्यासाठी पश्चिम रेल्वेने स्वयंचलित पर्जन्यमापक उपकरणे बसवली जाणार आहेत. त्याअनुषंगाने पश्चिम रेल्वेवरील १० ठिकाणांचे सर्वेक्षण झाले आहे. अशाप्रकारे रेल्वेने पावसाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी पाऊल उचलले आहे. अनेक भाग सखल असून तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून लोकल वाहतूक विस्कळीत होते. अशावेळी या भागात पडणाऱ्या पावसाचा सरासरी अंदाज मिळाल्यास लोकल सेवांच्या नियोजनास साहाय्य मिळू शकते. 
 वांद्रे, अंधेरी, माहीम, ग्रँट रोड, गोरेगाव, वसई रोड आणि विरार या भागात प्रामुख्याने पावसाचे पाणी भरते. त्यामुळे लोकलची वाहतूक कोलमडते. प्रभादेवी-दादर-माटुंगा विभागातील पूरस्थिती कमी करण्यासाठी, प्रमोद महाजन गार्डन येथे महानगरपालिकेच्या समन्वयाने १ लाख घनमीटर क्षमतेचा होल्डिंग पॉन्ड विकसित केला आहे. माहीम-वांद्रे-खार विभागातील पूर समस्या हाताळण्यासाठी, डिस्चार्ज आउटलेट ३०० मिमी व्यासावरून १,२०० मिमी व्यासापर्यंत वाढवले आहे. तसेच सखल भागातील ट्रॅकची उंची १०० मिमी ते २५० मिमीपर्यंत वाढविली आहे.

 पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान १० स्वयंचलित पर्जन्यमापक उपकरणे बसविण्यास सुरुवात झाली आहे. 

 यामुळे पावसाची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल, त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीचे नियोजन करणे रेल्वेला शक्य होईल. सध्या, वांद्रे आणि खारदरम्यान एक स्वयंचलित पर्जन्यमापक बसविला आहे.
 

Web Title: Westen railway will run even in stormy rain; Traffic planning will be done with the help of rain gauge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.