Join us  

बलात्काराच्या घटनांना वेस्टर्न कल्चर जबाबदार- इंद्रेश कुमार

By admin | Published: June 03, 2017 11:39 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3-  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. भारतातील बलात्काराच्या घटनांना आणि घरगुती हिंसाचाराला वेस्टर्न कल्चर जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इंद्रेश कुमार यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतातील लोक पाश्चात्य संस्कृतीचं खूप अनुकरण करतात म्हणूनच असे प्रकार घडतात, असं इंद्रेश कुमार यांचं म्हणणं आहे. 
भारतीय संस्कृतीत प्रेमाला पावित्र्य आहे. या पावित्र्यामुळे स्त्री-पुरुष संबंधांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यामुळे भारतीयांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने प्रेमाचं सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करण्याऐवजी त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे, तसं केल्यास भारतीय महिलांचा तिहेरी तलाक, स्त्री-भृणहत्या आणि घरगुती हिंसेसारख्या घटनांना सामोर जावं लागणार नाही. असंही इंद्रेश कुमार म्हणाले आहेत. 
इंद्रेश कुमार यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात यासंदर्भात विधान केलं होतं. भारतीय संस्कृतीमधील प्रेम हे शुद्ध आणि धार्मिक प्रवृत्तीचं होतं. पण, वेस्टर्न कल्चरने ‘व्हॅलेंटाईन्स डे’ च्यानिमित्ताने या प्रेमाचं बाजारीकरण केलं. भारतच नाही तर जगातील अनेक देश या गोष्टीला सामोर जात आहेत. 
याआधी इंद्रेश कुमार यांनी गोमांस बंदीसंदर्भातही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. बीफ खाणाऱ्या लोकांमुळे देशाची अब्रू जाते आहे. त्यांचं कृत्य माणुसकीला काळिमा फासणारं आहे. त्यामुळे या लोकांनी आपल्या सवयी बदलायला हव्या, असं ते म्हणाले होते. सव्वाशे कोटींच्या भारतात फार थोडेजण गोमांसाचे सेवन करतात, त्यामुळे या लोकांनी आपल्या पद्धती बदलल्या तर बरं होईल, असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं होतं.