७१ तिकीट दलालांवर पश्चिम रेल्वेची कारवाई, तब्बल २६ लाखांची तिकिटे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 08:52 AM2023-05-29T08:52:37+5:302023-05-29T08:52:58+5:30
पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मे महिन्यात ७१ तिकीट दलालांना पकडले आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने मे महिन्यात ७१ तिकीट दलालांना पकडले आहे. त्यांच्याकडून २६ लाखांची तिकिटे जप्त केली आहेत. अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही.
ई-तिकीट आणि खिडकी तिकिटांच्या विरोधात विशेष मोहिमेत अंधेरी येथे एका दलालाला अटक केली. तसेच साकी नाका परिसरात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. १५ मे रोजी आरपीएफ आणि दक्षता विभागाचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने अलीम खान याच्याकडून १ लाख ३ हजार ९८५ किमतीची १४ जर्नी कम रिझर्व्हेशन तिकिटे ताब्यात घेऊन अंधेरी आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी केली असता अलीम खानने सोबत अफजल नफीस खान काम करीत असल्याचे सांगितले. अफजल नफीस खान खास २२ मे रोजी आरपीएफने ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
६३ गुन्हे दाखल
दलालांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. हीच बाब निदर्शनास आल्याने १ ते २७ मेदरम्यान आरपीएफने ७१ तिकीट दलालांवर ६३ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २६ लाख ६१ हजार ३१० रुपयांची ई-तिकिटे जप्त केली.