एसी लोकलबाबत पश्चिम रेल्वे चिडिचूप
By admin | Published: March 28, 2016 02:41 AM2016-03-28T02:41:44+5:302016-03-28T02:41:44+5:30
पश्चिम रेल्वेवर येणारी एसी (वातानुकूलित) लोकल मध्य रेल्वेच्या वाट्याला देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्यानंतर तिची प्रतीक्षा करणाऱ्या पश्चिम रेल्वेने यावर चिडिचूप राहणे पसंत केले
मुंबई : पश्चिम रेल्वेवर येणारी एसी (वातानुकूलित) लोकल मध्य रेल्वेच्या वाट्याला देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्यानंतर तिची प्रतीक्षा करणाऱ्या पश्चिम रेल्वेने यावर चिडिचूप राहणे पसंत केले आहे. पहिल्या एसी लोकलनंतर आता दुसऱ्या एसी लोकलची प्रतीक्षा पश्चिम रेल्वेकडून केली जात आहे.
एसी लोकल पश्चिम रेल्वेवर येणार अशी चर्चा वर्षभरापेक्षा जास्त काळ सुरू होती. चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) बनत असलेल्या या लोकलची पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार माहितीही घेण्यात आली व ती उपनगरीय प्रवाशांसमोर मांडण्यात आली. पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरीवली अशी जलद चालविण्याचे नियोजनही केले. मात्र एमयूटीपी-२ अंतर्गत येणाऱ्या ७२ नव्या बम्बार्डियर लोकलबरोबरच एसी लोकलही पश्चिम रेल्वेच्या वाट्याला येत असल्याने मध्य रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर नुकतेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करत मध्य रेल्वेवर एसी लोकल दाखल होणार असल्याचे सांगितले. तर महाव्यवस्थापक यांनीही आयसीएफमध्ये जाऊन बनत असलेल्या एसी लोकलचा आढावा घेतला. आता ही पहिली लोकल १६ एप्रिल रोजी मुंबईत दाखल होणार असून, या लोकलच्या चाचण्या ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते पनवेल मार्गावर करण्याचे नियोजन केले आहे. ही चाचणी करताना सुरुवातीला फक्त महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. १२ डब्यांची असलेल्या एसी लोकलची सुरुवातीला एक फेरी होईल. ट्रान्स हार्बरला एसी लोकलची लॉटरी लागल्याने याबाबत पश्चिम रेल्वेने मात्र चिडिचूप राहणे पसंत केले आहे.
रेल्वे मंत्रालयानेच एसी लोकलचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या एसी लोकलची प्रतीक्षा करणार आहोत. कारण आयसीएफला एसी लोकल बनविण्याचे काम देण्यात आलेले आहे.
- रवींद्र भाकर, पश्चिम रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी