मुंबई - पश्चिम रेल्वेच्यामुंबई उपनगरी विभागात रुळ, छाेटे नाले, क्लवर्ट लगत कचऱ्याचे ढीग साचत असून, ते प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. माहीम स्टेशन यार्ड परिसरात राबवलेल्या या मोहिमेत गेल्या दोन महिन्यांत १,२०० क्युबिक मीटर म्हणजे साधारण १०० ट्रक कचरा काढण्यात आला. रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद असताना जेसीबी, पोकलेन तसेच विशेष यंत्रांद्वारे सफाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुळ, नाल्यांतील कचऱ्यामुळे अनेकदा पॉइंट मशीनमध्ये बिघाड होते. पावसाळ्यात नाल्यांमध्ये प्लास्टिक अडकल्यामुळे रुळांलगत पाणी साचते. परिणामी सेवा विस्कळीत होते. माहीम यार्डजवळ अनेकदा स्वच्छता करूनही रुळांलगतच्या वस्त्यांमधून कचरा टाकण्यात येत आहे. कचरामुक्तीसाठी रेल्वेने दररोज ट्रॅक आणि यार्ड स्वच्छ करण्यासाठी सुमारे २५-३० कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच कचरा सफाईसाठी ५९ लाख रुपयांचे कंत्राट दिले आहे. रुळांवर कचरा टाकू नये, यासाठी ‘नुक्कड’ नाटकद्वारे जागृती करण्यात येत आहे. दुसरीकडे रेल्वेने काँक्रीट डस्टबिनही उपलब्ध करून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नालेसफाईला वेगपावसाळा सुरू होण्यास काही आठवडे बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने नालेसफाई तसेच रुळांलगत सफाईची कामे हाती घेतली आहेत. मध्य रेल्वेने चुनाभट्टी, कुर्ला, शीव, भांडुप अशा अनेक सखल भागांमध्ये पाणी साचत असल्याने तेथे सफाई सुरू केली आहे. तेथे पाणी साचू नये, यासाठी काळजी घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोखंडी जाळ्यांसाठी ३६ लाखांचा खर्च रुळ ओलांडणे आणि कचऱ्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने लोखंडी मोल्ड कंपोझिट मटेरियल वापरून लांब उंचीचे बॅरिकेड उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्याकरिता ३६ लाख खर्च करण्यात येत आहेत. माहीम येथे अप हार्बर मार्गाच्या पूर्वेला रेल्वेच्या सीमेवर ३० मीटर लांबीचे लोखंडी पॅनेल बसवले आहे. तसेच आसपासच्या वस्त्यांमधून रुळांवर कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी आरपीएफचे २४ तास कर्मचारी तैनात केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. रुळांवर कचरा फेकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून दंड आकारण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आहे. - विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे