Join us

पश्चिम रेल्वेचा खोळंबा

By admin | Published: January 20, 2015 2:13 AM

गोरेगाव ते जोगेश्वरीदरम्यान ट्रॅकखाली असलेल्या छोट्या नाल्याजवळील कचऱ्याला आग लागली

मुंबई : मध्य रेल्वे दिवसेंदिवस विस्कळीत होत असतानाच आता पश्चिम रेल्वेही यात मागे नसल्याचे दिसून येते. गोरेगाव ते जोगेश्वरीदरम्यान ट्रॅकखाली असलेल्या छोट्या नाल्याजवळील कचऱ्याला आग लागली आणि ही आग वर येऊ लागल्याने त्याचा लोकल सेवेवर परिणाम झाल्याची घटना सोमवारी घडली. दुपारी साडे तीन वाजता ही बाब निदर्शनास आल्याने कुठलाही धोका न पत्करता अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल मोटरमनकडून त्वरित थांबविण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर ती आग अर्धा तासांत विझविण्यात आली आणि लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या. मात्र या घटनेमुळे लोकल तब्बल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे पश्चिम रेल्वे धीम्या मार्गावरील स्थानकांवर गर्दीचे चित्र होते. तर तीन लोकल रद्द करण्यात आल्या. याबाबत पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गजानन महतपूरकर यांना विचारले असता, एका नाल्याजवळील कचऱ्याला आग लागली होती. ती आग ट्रॅकखालून येत असल्यानेच मोटरमनकडून खबरदारी म्हणून लोकल थांबविण्यात आल्या. मात्र लोकल सेवा त्वरित सुरूही करण्यात आल्या. (प्रतिनिधी)