मुंबई : लोकलच्या पेन्टाग्राफमध्ये ओव्हरहेड वायर अडकल्याने तांत्रिक समस्या उद्भवून पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली. नोकरदारांना त्याचा फटका बसला. प्रवाशांनी पर्यायी मार्ग निवडल्याने बोरीवली ते वांद्रे या पट्ट्यात रस्त्यांवरही प्रचंड कोंडी झाली. पश्चिम रेल्वेला तब्बल ६0 लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनाही लेटमार्क लागला. कांदिवली ते बोरीवलीदरम्यान बोरीवली-चर्चगेट लोकलचा पेन्टाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. सकाळी ६.३0च्या सुमारास अप धीम्या मार्गावर ही तांत्रिक समस्या उद्भवली. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला. अप धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम हळूहळू डाऊन धीम्या मार्गावरील सेवेवरही झाला. तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी लोकल आणि ओव्हरहेड वायरला होत असलेला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. विद्युत पुरवठा फारसा होत नसल्याने बोरीवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३, ७, ८ वरून लोकल फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे या स्थानकात मोठी गर्दी झाली. तर ४, ५, ६ व ६अ प्लॅटफॉर्मवरून लोकल सोडण्यात येत असल्याने तिथे गर्दी झाली होती. सकाळी ९.२0च्या सुमारास ही समस्या सोडविण्यात यश आले व लोकल सेवा पूर्ववत झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी १८ जादा फेऱ्या चालविण्यात आल्या. (प्रतिनिधी) महामार्गावर वाहतूककोंडी प्रवाशांनी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडल्यामुळे खासगी वाहने तसेच रिक्षांची पश्चिम द्रुतगती महामार्गावर कोंडी झाली. बोरीवली ते मालाड प्रवासासाठी एक ते दोन तास लागत होते. सोमवारी २३१ पेपर्सच्या परीक्षा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये सकाळच्या सत्रात ९८ पेपर्स होते. एमए (भाग-१ व २), टीवायबीकॉम, बी.कॉम (सेमी-६) (सीबीएसजीएस), एम.एससी (सेमी-१) (सीबीएसजीएस) यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षांचा समावेश होता. या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे शक्य झाले नाही. परीक्षा नियंत्रकांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना नजीकच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आल्याचे विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव लीलाधर बनसोड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने अतिरिक्त वेळ दिल्याचे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचा बोजवारा
By admin | Published: April 12, 2016 3:25 AM