मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद आहे. मात्र पश्चिम रेल्वेने जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी मालवाहतूक गाडी, पार्सल गाडी सुरु ठेवली आहे. लॉकडाऊन काळातील मागील चार महिन्यात पश्चिम रेल्वेने जीवनावश्यक सामग्रीचे १० हजार ७९८ रेक लोड केले. त्यामुळे पश्चिम रेल्वेला २ हजार ८०९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
दूध, धान्य, औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, मासे, अंडी, बियाणे, टपाल पिशव्या, कच्चा माल, इंधन, सिमेंट यासारख्या जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक सुरु आहे. पश्चिम रेल्वेने मार्च अखेरीपासून ते ३१ जुलैपर्यंत जीवनावश्यक इंधनाचे १ हजार १५५, खते १ हजार ८४०, कंटेनर ५ हजार ७६, मीठ ५८६ , धान्य १०९, सिमेंट ८४४, कोळसा ४२५ आणि इतर रेकमधून अन्य महत्वाच्या सामग्रीची वाहतूक केली.
लॉकडाऊन काळात देशातील कानाकोपऱ्यात रेल्वेद्वारे जीवनावश्यक सामग्रीसह सिमेंट, इंधन यांची वाहतूक सुरु आहे. देशात जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने मालगाडी, पार्सल गाडीच्या वेळेचे नियोजन केले आहे. या कामगिरीमुळे रेल्वे प्रशासन कोरोनाच्या युद्धात मोलाचे योगदान देत आहे.
पश्चिम रेल्वेने २२ मार्च ते ३१ जुलै याकाळात ४३५ पार्सल गाड्या चालविल्या. यातून ८८ हजार टन वजनाच्या मासे, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक करून पश्चिम रेल्वेने २८ कोटी रुपये कमाविले. ५० हजार टन वजनी दुधाची वाहतूक करण्यात आली. यासाठी ६६ विशेष दुधाच्या गाड्या चालविण्यात आल्या. यातून पश्चिम रेल्वेला ८ कोटी ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासह ३५३ कोरोना विशेष पार्सल गाड्या चालविण्यात आल्या. यातून ३१ हजार टन वजनी सामग्रीची वाहतूक करण्यात आली. यामधून पश्चिम रेल्वेला १५ कोटी ८५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.