पश्चिम रेल्वेने पार्सल गाड्यांची वाहतूक करून ५ कोटी ६५ लाखांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 06:46 PM2020-04-26T18:46:53+5:302020-04-26T18:47:25+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावर फक्त मालगाडी आणि पार्सल गाडी धावत आहे. यांच्याद्वारे देशभरातील नागरिकांना मासे, दुध, धान्य, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा केला जातोय.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर फक्त मालगाडी आणि पार्सल गाडी धावत आहे. यांच्याद्वारे देशभरातील नागरिकांना मासे, दुध, धान्य, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा केला जातोय. त्यामुळे पश्चिम रेल्वेने २३ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत ५ कोटी ६५ लाख रुपये कमावले आहेत. या कालावधीत पश्चिम रेल्वेने १९ हजार टन जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक देशभरात केली.
लॉकडाऊनमुळे देशभरात प्रवासी रेल्वे वाहतूक बंद आहे. त्यामुळे रेल्वे विभागाचे अर्थचक्र बदलले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करण्यासाठी विशेष मालगाडी, पार्सल गाडी सुरु असल्याने पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत ५ कोटी ६५ लाख रुपये जमा झालेत.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले कि, लॉकडाऊन काळात पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे पार्सल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. पश्चिम रेल्वेने लॉकडाउन काळात दुधाच्या विशेष १६गाड्या चालविल्या आहेत. त्यातून ११ हजार टन दुधाची वाहतुक झाली असून त्यामधून १ कोटी ९६ लाख रुपये मिळाले आहेत. पश्चिम रेल्वेने चालविलेल्या ८४ पार्सल ट्रेनमधून २ कोटी ७९ लाखांचा महसुल मिळाला आहे. याशिवाय ४ हजार ६४२ मालगाडयांना देशाच्या विविध भागाशी जोडण्यात आले. ८९ विशेष पार्सल गाडीमधून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे. त्यातून २ कोटी ९१ लाखांचा महसूल मिळाला आहे. ४ मालगाड्यामधून १ हजार ८६४ सामग्रीची वाहतूक करून ७७ लाख ६५ हजार रुपयांचा महसूल पश्चिम रेल्वेला मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेद्वारे पोरबंदर-शालिमार, वांद्रे टर्मिनस-लुधियाना, ओखा-वांद्रे टर्मिनस, भुज-दादर, वांद्रे टर्मिनस- ओखा करमबेली - न्यू गुवाहाटी आणि पालनपुर - सालचपरा या दरम्यान फेऱ्या चालविण्यात येत आहेत