लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता पश्चिम रेल्वेच्या वतीने सोडण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग पहिल्या पाच मिनिटांत फुल झाल्याची माहिती आता समोर येत आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटनांंनी या गाड्यांचे आरक्षण सुरुवातीला ८०० वेटिंग दाखविल्यानंतर पाच मिनिटांनी बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची यंदाही दमछाक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी २०२ विशेष रेल्वे गाड्या फेऱ्या सुरू केल्यानंतर त्याचे आरक्षणदेखील पहिल्याच काही मिनिटांत ८०० वेटिंगवर पोहोचून बंद झाले होते. आता पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण २८ जुलैला सकाळी सुरू झाले पण तेदेखील पहिल्या पाच मिनिटांत ८०० वेटिंग गेल्याने प्रवाशांना पुढे आरक्षण करताच आले नाही. दरम्यान, आतापर्यंत सोडण्यात आलेल्या सर्व रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या असून खासगी बसचे दोन ते अडीच हजारांचे तिकीट कसे परवडणार? असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
‘गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी बोरिवलीतून रेल्वे’
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे येथून कोकणासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. मात्र, बोरिवली येथून एकही गाडी कोकणात जात नसल्याने उत्तर मुंबईतील चाकरमान्यांची गैरसोय होते. हे लक्षात घेऊनच यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी बोरिवली येथून वसई मार्गे रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत लवकरच या सेवेचा शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
रेल्वेने कोकणवासीयांना वेटिंग तिकिटावर प्रवास करू देण्याची परवानगी दिली पाहिजे अन्यथा चाकरमान्यांची मोठी परवड होईल. कारण खासगी बसचे तिकीट अशा काळात ३ हजारांवर जाते. चाकरमान्यांना हे परवडत नाही. - दिनेश हळदणकर, कोकण रेल्वे प्रवासी
गेल्या कित्येक वर्षांपासून आरक्षणाच्या अडचणी सुरू आहेत. दोन वर्षांपासून चाकरमान्यांनी आवाज उठविल्यानंतर आता या अडचणी सर्वांना दिसू लागल्या आहेत. त्यासाठी दलालांवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच कोकणासाठी जास्तीत जास्त जादा गाड्या सोडल्या पाहिजेत. - राजू कांबळे, प्रमुख, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ
----००००----