गोरेगाव-चर्चगेट ९.५३ ची लोकल रद्द करण्याचा घाट; सेवा कायम सुरू ठेवण्यासाठी सह्यांची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:46 AM2024-04-24T11:46:07+5:302024-04-24T11:47:50+5:30
पश्चिम रेल्वेने सकाळी गर्दीच्या वेळी सुटणारी ९.५३ वाजताची गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट घातला आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेने सकाळी गर्दीच्या वेळी सुटणारी ९.५३ वाजताची गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट घातला आहे. या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ही लोकल सुरू ठेवावी, यासाठी महिला प्रवाशांनी लोकलमध्ये स्वाक्षरी अभियान राबविले.
विरार, बोरिवली येथून चर्चगेटच्या दिशेने सर्वाधिक जलद लोकल धावतात. या लोकल मधल्या स्थानकांमध्ये थांबत नाही. त्यात बोरिवलीहून सुटणाऱ्या अर्ध जलद लोकल या बोरिवली ते मालाडदरम्यान पूर्णपणे प्रवाशांनी भरून गोरेगावला येतात. त्यामुळे गोरेगाव येथील प्रवाशांना लोकलमध्ये चढायला जागा मिळत नाही. काही प्रवासी नाइलाजाने मग लोकलच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करतात. गेल्या १० ते १२ वर्षांहून अधिक काळ गोरेगावहून सकाळी गर्दीच्या वेळी ८.२७ पासून अर्धा तासाच्या अंतराने ९.५३ पर्यंत चार जलद लोकल सेवा सुरू आहेत. या सर्व लोकल गोरेगावनंतर जोगेश्वरी येथून पूर्णपणे प्रवाशांनी भरतात. असे असताना पश्चिम रेल्वेने ९.५३ ची लोकल बंद करण्याचा घाट घातल्याने प्रवाशांनी नापसंती व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे.
लोकल सेवा बंद होऊ नये म्हणून मी स्वाक्षरी मोहीम राबवली. या मोहिमेला प्रवाशांनी सहकार्य केले आहे.- स्वाती झाड
गोरेगावच्या या जलद लोकलला अंधेरीला थांबा दिला तरी चालेल, पण वर्दळीच्या वेळी धावणारी ही लोकल रद्द करू नये.- कल्पना दिवाण
गोरेगावहून सकाळी चर्चगेटपर्यंतचा प्रवास करायचा असतो. या लोकलमुळे किमान सकाळच्या वेळी तरी आम्हाला बसायला जागा मिळते. - रेखा निकम