मुंबई - पश्चिम रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट तसेच चुकीच्या तिकिटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल ६२.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये लोकलमधील फुकट्यांकडून २० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा दंड आकारल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. लोकल, मेल-एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनमध्ये ही मोहीम हाती घेण्यात आली होती.
दरम्यान, ऑगस्टमध्ये संपूर्ण पश्चिम रेल्वे मार्गावर १.१९ लाख विनातिकीट व चुकार प्रवाशांकडून ४ कोटी ९६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात लोकलमधील ८२ हजार फुकट्या प्रवाशांकडून वसूल केलेल्या २.६२ कोटी रुपयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत एसी लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल २३ हजार ८०० प्रवाशांकडून ७८ लाखांच्या दंडाची आकारणी केल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.