Join us

पश्चिम रेल्वेचे ‘मिशन फूड डिस्ट्रिब्यूशन’ अभियान सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 6:11 PM

खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे, किराणा सामग्री, औषधांचे वितरण पश्चिम रेल्वेच्या विभागात केले जात आहे.

 

मुंबई : पश्चिम रेल्वेद्वारे ‘मिशन फूड डिस्ट्रिब्यूशन’ अभियान सुरू आहे. या अभियानातुन खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे, किराणा सामग्री, औषधांचे वितरण पश्चिम रेल्वेच्या विभागात केले जात आहे. यासह आयआरसीटीसीकडून ‘ऑपरेशन ब्रेक द हंगर’ सुरू आहे.  या दोन्ही अभियानाला  सामाजिक संस्थांचे योगदान आहे. 

 पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या  मुंबई, अहमदाबाद, राजकोट, बडोदा, रतलाम, भावनगर या सहा विभागात ‘मिशन फूड़ डिस्ट्रिब्यूशन’ अभियान सुरू आहे. या विभागातील वेगवेगळ्या स्थानकाच्या आसपासच्या परिसरातील गरजु व्यक्तींना खाद्यपदार्थांची पाकिटे वाटली जात आहेत.  तर, आयआरसीटीसीच्या मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद येथील बेस किचनद्वारे ‘ऑपरेशन ब्रेक द हंगर’ सुरू आहे.

मुंबईसह इतर ठिकाणच्या गरजूंना खाद्यपदार्थ पाकिटे वाटप केले जाते. मुंबईतील वेगवेगळ्या भागात दररोज 5 हजार 600 जणांना, अहमदाबाद मध्ये दररोज 2 हजार 500 जणांना खाद्यपदार्थांची पाकिटे वाटण्यात आली. 

मुंबई विभागात 29 मार्चपासून ते 17 एप्रिलपर्यंत सुमारे 1 लाखाहून अधिक पाकिटे देण्यात आली. तर, याच कालावधीत अहमदाबाद विभागात सुमारे 95 हजाराहून अधिक पाकिटे देण्यात आली. वडोदरा विभागात 1 हजार 550, रतलाम विभागात 450 आणि राजकोट विभागात  350 खाद्यपदार्थांची पाकिटे दिली, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

देशासह संपूर्ण जगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बेघर आणि रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना बसत आहे. त्यामुळे त्यांना अन्नदान करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

 

टॅग्स :अन्नकोरोना सकारात्मक बातम्यारेल्वेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस