आज सोमवारचा कार्यालयीन कामांचा पहिलाच दिवस आणि पश्चिम रेल्वेवर मोठा गोंधळ उडाला आहे. बोरिवली नजीक ओव्हरहेड वायर तुटल्याने पहाटेपासून प. रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना सुमारे पाऊन तास लोकलमध्येच बसून रहावे लागले आहे.
बोरिवली स्थानकावर पहाटेपासून प्रवासी ताटकळत थांबले होते. चार प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले होते. लोकलमध्ये सुमारे तासभर लोक थांबले तरी लोकल सुरु होत नसल्याने प्रवाशांनी स्टेशन मास्तरांची केबिन गाठली. तेव्हा तिथे ओव्हरहेड वायर तुटल्याचे सांगण्यात आले. मात्र, तोपर्यंत कोणतीही घोषणा करण्यात येत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
पहाटे साडे पाच वाजल्यापासून प्रवासी ताटकळले होते. सर्व वाहतूक स्लो ट्रॅकवरून वळविण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. काही लोकल रद्द करण्यात आल्या असून काही लोकल स्थानकांमध्ये थांबविण्यात आल्या आहेत.