Join us

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल; पहिल्याच दिवशी सावळागोंधळ, २५६ लोकल रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 5:36 AM

पश्चिम रेल्वेच्या लोकल स्टेशनवर खचाखच गर्दी, त्यात इंडिकेटरही बंद

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान १५ वर्षे रखडलेल्या सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने हाती घेतलेल्या मेगाब्लॉकच्या पहिल्याच दिवशी यंत्रणांत समन्वय नसल्याने, इंडिकेटर बंद पडल्याने आणि २५६ लोकल फेऱ्या रद्द केल्यावर पर्यायी वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला. सर्वच स्थानकांत प्रवाशांची खचाखच गर्दी होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. 

या गोंधळामुळे प्रवाशांचा पारा चढत गेल्याने परिस्थितीचे भान आलेल्या पश्चिम रेल्वेने बेस्टची मदत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हा मेगाब्लॉक ६ नोव्हेंबरपर्यत असल्याने तोपर्यंत वाहतुकीचे नियोजन न केल्यास प्रवाशांना असेच हाल सोसावे लागण्याची चिन्हे आहेत.     

खार ते गोरेगावदरम्यान ब्लॉक असला, तरी इंडिकेटर बंद पडल्याने गोंधळात भर पडली. अनेक लोकलचा प्रवास अंधेरी स्थानकात संपवण्यात गर्दी वाढत गेली. बोरिवली, विरार, गोरेगावहून येणाऱ्या गाड्या आधीच खचाखच भरलेल्या असतात. फेऱ्या रद्द केल्याने खार ते गोरेगावच्या प्रवाशांना सकाळी लोकलमध्ये चढणे मुश्कील बनले.

कामावर निघालेल्या अनेकांना लेटमार्क 

या स्थानकांत प्रवाशांची खच्चून गर्दी झाली होती. फेऱ्या रद्द झाल्यानंतर उरलेल्या फेऱ्याही २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत असल्याने या गर्दीत भर पडत गेली. कामावर निघालेल्या अनेकांना लेटमार्क लागला. कामावरुन परतणाऱ्यांनाही लोकलची संख्या कमी असल्याने उशीर झाला. जवळच्या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी ब्लॉक लक्षात घेता रिक्षाने प्रवास केला खरा, पण रिक्षाचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले. त्यामुळे त्या प्रवाशांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागला.

फेऱ्या रद्द केल्यामुळे ५३७ जवान तैनात

लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे शुक्रवारी पश्चिम रेल्वे स्थानकांवरील प्रचंड गर्दी उसळली. त्यातून चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू नयेत म्हणून पश्चिम रेल्वेने अनेक प्रमुख स्थानकात १७८ लोहमार्ग पोलीस आणि ३५९ आरपीएफ जवान असा ५३७ जणांचा बंदोबस्त लावला होता. 

पश्चिम रेल्वेने सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी लोकल फेऱ्या कमी केल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून जादा गाड्या सोडण्याबाबत बेस्टशी चर्चा सुरु आहे. -  सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेच्या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक परिसरात वायुवेग पथकांना लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात येतील. जादा भाडे घेतल्यास प्रवाशांनी ई-मेल किंवा व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे तक्रार नोंदवावी. त्यानुसार कारवाई करण्यात येईल. - विनय अहिरे,  प्रवक्ता परिवहन विभाग

ट्रान्स हार्बर, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

विविध कामांसाठी ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या कालावधीत लोकल बंद असतील. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नसेल.पश्चिम रेल्वेकडून रविवारी मध्यरात्री १२. ३० ते पहाटे ४ पर्यंत वसई रोड ते विरार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

 

टॅग्स :पश्चिम रेल्वे