मुंबई : मुंबईकरांची पसंतीस उतरलेल्या एसी लोकल प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने खुशखबर दिली आहे. 25 जून पासून एसी लोकलच्या भाडेवाढीला सहा महिन्यांसाठी स्थगिती देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यामुळे किमान डिसेंबरपर्यंत एसी लोकलचे भाडे 'जैसे थे' राहणार आहे. नाताळच्या मुहूर्तावर मुंबईत देशातील पहिली एसी लोकल सुरू झाली. सुरुवातीला बोरिवली ते चर्चगेट दरम्यान लोकल सुरू झाल्यानंतर या लोकलचा विरारपर्यंत विस्तार करण्यात आला.
एसी लोकलचं पहिल्या सहा महिन्यांसाठी जीएसटीसह किमान तिकीट ६० रुपये असून कमाल भाडं २०५ रुपये असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. 25 जून पासून नवीन भाडे लागू होणार होती, तथापि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून सहा महिन्यांसाठी भाडेवाढ पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबईकर डिस्काउंट रेट मध्ये सध्या एसी लोकलचा अनुभव घेत आहेत. प्रवाशांची मते जाणून घेतली असता तूर्तास तरी भाडेवाढ न करण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली होती. यानुसार आगामी सहा महिन्यासाठी भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.