Join us

पश्चिम रेल्वे उद्यापासून रुळावर, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 7:19 AM

पश्चिम रेल्वेवर २९ दिवस ब्लॉक घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले.

मुंबई :  पश्चिम रेल्वेवर खार - गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी घेण्यात येत असलेल्या ब्लॉकचा रविवार  अखेरचा दिवस असून, रविवारी ११० लोकल फेऱ्या रद्द असतील. परंतु, सोमवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील फेऱ्या पूर्ववत केल्या जाणार आहेत.  तसेच लवकरच सहावी मार्गिका प्रवासी सेवेत येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेवर २९ दिवस ब्लॉक घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले. हे काम खार ते गोरेगावदरम्यान सुरू असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक महत्त्वाचे काम ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत केले जात असल्याने पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत दिवसाला ३१६ फेऱ्या रद्द करण्याचे नियोजन केले होते.

मात्र, दिवाळीच्या तोंडावर प्रवासी घराबाहेर पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रद्द केलेल्या अनेक लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. दरम्यान, शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर ९३ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. 

टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबई