"रेल्वे जमिनीवर असलेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी पश्चिम रेल्वे सकारात्मक"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 02:38 PM2021-12-10T14:38:47+5:302021-12-10T14:48:15+5:30
Gopal Shetty News : मुंबईच्या सर्व रेल्वे जमिनी आणि केंद्र सरकारच्या जमिनीवरील वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना आपल्या हक्काचे घर द्या अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी संसदेच्या शून्य प्रहरात केली होती.
मनोहर कुंभेजकर
मुंबई - पश्चिम रेल्वे जमिनीवर वसलेल्या झोपडपट्यांच्या पुनर्वसन, स्थानांतरण आणि रेल्वेचा विकास होण्यासाठी रेल्वे प्रशासन झटत आहे. मुंबईच्या सर्व रेल्वे जमिनी आणि केंद्र सरकारच्या जमिनीवरील वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना आपल्या हक्काचे घर द्या अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ३ डिसेंबरला संसदेच्या शून्य प्रहरात केली होती.
विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे जेव्हा केंद्रात शहरी विकास मंत्री होते, त्यावेळी दिल्ली येथील केंद्रीय जमिनीवर असलेल्या सर्व झोपडी धारकांना नियमित करणार आले होते. रेल्वे ट्रॅक शेजारी राहणाऱ्या झोपड्या दूर करून रेल्वे विकास प्रकल्प पूर्ण केले पाहिजे,यासाठी १९८५ साली काही नागरिक न्यायालयात गेले होते अशी माहिती त्यांनी दिली.
रेल्वे ट्रॅक वसलेल्या झोपडपट्टी स्थलांतराच्या कायदा बनलेला आहे. दिल्ली येथील झोपडपट्टी पुनर्वसना संदर्भात २०१५ पर्यंतच्या सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी अधिनियम लागू करण्यात आले होते आणि गुजरात येथे दहा हजार लोकांना न्याय मिळावा म्हणून तेही न्यायालयात गेले असून काही दिवसात निकाल लागेल अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.
संपूर्ण देशात एक कायदा असावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या जमिनीवर वसलेल्या नागरिकांना जे नियम दिल्ली आणि गुजरातमध्ये लागू होतात,तेच नियम संपूर्ण देशात लागू करण्यात यावे असे त्यांनी भाषणात सांगितले आहे. दिल्ली न्यायालयाने रेल्वे जमिनीवर असलेल्या नागरिकांना पर्यायी जागा दिल्यानंतर रेल्वे विकास कार्य सुरू करू असे एका एफिडेविट नोंदवताना नमूद केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
रेल्वे जमिनीवर असलेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी पश्चिम रेल्वे सकारत्मक आहे. ६ डिसेंबरला शेट्टी यांनी पश्चिम रेल्वे महाप्रबंधक आलोक कंसल यांना पत्र लिहिले होते. त्याला कंन्सल यांनी उत्तर दिले असून रेल्वे ट्रॅकवर वसलेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसन व स्थलांतरासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत. तसेच महाप्रबंधकांनी शेट्टी यांचे पश्चिम रेल्वे जमिनीवर वसलेल्या नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना घर देण्याच्या विकासकार्याला गती देण्यासाठी संवाद साधला बद्दल आभार व्यक्त केले. यासंदर्भात होणारे निर्णय आपल्याला कळविण्यात येतील असे ही पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे जमिनीवर असलेल्या हजारो झोपडपट्टीवासियांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.