लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विभागांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या होर्डिंग्जच्या वाढत्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या होर्डिंग उत्पन्नात जास्त वाढ झाली आहे. यावर्षी होर्डिंगच्या माध्यमातून ५४ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे होर्डिंगची माहिती मागितली होती. रेल्वे प्रशासनाने अनिल गलगली यांना २०१५-१६ पासून वर्ष २०१९ -२० वर्षाची माहिती दिली आहे.
पश्चिम रेल्वेने वर्ष २०१५-१६ मध्ये ३३.१५ कोटी, वर्ष २०१६-१७ मध्ये ३५.७७ कोटी, वर्ष २०१७ ते १८ मध्ये ४०.१८ आणि २०१९ ते २० मध्ये ५४.४८ उत्पन्न मिळवले आहे. तरमध्य रेल्वेने वर्ष २०१५-१६मध्ये ५.९२कोटी, वर्ष २०१६-१७ मध्ये ५.९६ कोटी, वर्ष २०१७-१८मध्ये ६.६० कोटी, वर्ष २०१८-१९मध्ये ९.२३ कोटी आणि वर्ष २०१९-२० मध्ये ११.२३ कोटींची कमाई केली आहे.
याबाबत अनिल गलगली म्हणाले मी, बऱ्याच ठिकाणी वाटप केलेल्या जागेपेक्षा जागेचा अधिक वापर केला जातो, परंतु जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत अशी प्रकरणे समोर येत नाहीत. रेल्वे प्रशासनाने अशी माहिती आरटीआयच्या कलम ४ अन्वये ऑनलाइन करावी, जेणेकरून प्रत्येक नागरिकावर नजर ठेवता येईल. यासाठी विशेष पथक आवश्यक असून तक्रारीची प्रतीक्षा करण्याऐवजी अचानक पाहणी केल्यास अनियमितता उघडकीस येईल आणि रेल्वे प्रशासनाचा बुडणारा महसूल वाचेल.