पश्चिम रेल्वे करणार पाण्याचा पुनर्वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2016 02:24 AM2016-03-08T02:24:02+5:302016-03-08T02:24:02+5:30
पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे ५ कोटी ६0 लाख रुपये किमतीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे ५ कोटी ६0 लाख रुपये किमतीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातून रोज १० लाख लीटर पाण्याचा पुनर्वापर शक्य होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. प्लॅटफॉर्म, यार्डातील स्वच्छता तसेच ट्रेन धुण्यासाठी या पाण्याचा वापर होईल.
रेल्वेत पिण्यापासून अन्य वापरासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. बरेच पाणी वायाही जाते. त्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसाला ३२ लाख लीटर पाणी वापरले जाते. यातील प्रत्येकी १६ लाख लीटर पाणी पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी लागते. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
हा प्रकल्प मार्च २0१८पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे किमान २ वर्षांनंतर तरी पाण्याची मोठी बचत होण्यास मदत होईल.