मुंबई : मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल स्थानकात आधुनिक प्रतीक्षालय उभारणार आहे. त्या माध्यमातून पश्चिम रेल्वेला प्रतिवर्षी १८,८९,२४० रुपये, तर ५ वर्षांत १,००,४३,८२२ रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
या प्रतीक्षालयात मुंबई विमानतळाप्रमाणे प्रवाशांना आगमन व निर्गमन माहिती स्क्रीनद्वारे मिळणार आहे. तसेच प्रवाशांना गाड्यांची माहिती मिळावी यासाठी तेथे उद्घोषणा यंत्रणाही बसविण्यात येणार आहे. या आधुनिक प्रतीक्षालयाला अंदाजे ६२,४५,७४१ रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना वेगळा अनुभव घेता येणार आहे. या प्रतीक्षालयात नावीन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या विभागीय वाणिज्य व्यवस्थापक जागृती सिंगला यांनी विशेष मेहनत घेतली आहे, तर मुंबई विभागाने मुंबई सेंट्रल स्टेशनवर आधुनिक सोयीसुविधायुक्त प्रतीक्षालय उभारण्याचे एनएफआर कंत्राट एका असोसिएटला दिले आहे.
कसे असणार प्रतीक्षालय
प्रतीक्षालयात बसण्याची सुविधा, मोफत वायफाय, वृत्तपत्र, मासिके असणार आहेत. त्यासोबत इतरही सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत. मसाज स्पा, चार्जिंग पॉइंट, बूट पॉलिश, खानपान सेवा, पर्यटन साधने यांसह अन्य सुविधा उपलब्ध असतील. मात्र, या प्रतीक्षालयाच्या सुविधेसाठी प्रवाशांना शुल्क मोजावे लागणार आहे.