लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :कोकणी माणूस मुंबईत कुठेही कामाला असला, तरी त्याचे गणपतीच्या सणाला गावी कोकणात जाण्याचे नियोजन वर्षभरापूर्वीच ठरलेले असते. यंदा गणेशोत्सव ७ सप्टेंबरला आहे आणि त्यासाठी दोन दिवस आधीच कोकणात पोहोचण्याची चाकरमान्यांना घाई आहे. या कोकणातील गणेशभक्तांसाठी पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण खुले होताच काही मिनिटांत फुल्ल झाल्यानंतर, आता या गाड्यांचा गणपतीसाठी कोकणात गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आधार घ्यावा लागणार आहे. गुरुवारी रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांमध्ये या गाड्यांचा समावेश आहे. या आधी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने सात विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या. याचबरोबर आता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने वेगवेगळ्या सहा मार्गांवर गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या सहा गणपती विशेष गाड्यांपैकी ०९००२, ०९०१०, ०९०१६, ०९४११, ०९१४९ या पाच विशेष गाड्यांचे आरक्षण २८ जुलै रोजी सुरू करण्यात येणार आहे.
गणपती स्पेशल गाड्या
- मुंबई सेंट्रल ते ठोकूर साप्ताहिक विशेष (गाडी क्र. ०९००१/०९००२) - मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड आठवड्यातून सहा दिवस (गाडी क्र. ०९००९/०९०१०) - वांद्रे ते कुडाळ साप्ताहिक विशेष (गाडी क्र. ०९०१५/०९०१६) - अहमदाबाद ते कुडाळ साप्ताहिक विशेष (गाडी क्र. ०९४१२/०९४११) - विश्वामित्री ते कुडाळ साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन (गाडी क्र. ०९१५०/०९१४९) - अहमदाबाद ते मंगळूरु साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन (गाडी क्र. ०९४२४/०९४२३)