वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 10:38 AM2019-03-28T10:38:18+5:302019-03-28T10:53:02+5:30
वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. यामुळे लोकल वाहतूक ही १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे.
मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी (२८ मार्च) पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक उशिराने सुरू असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. यामुळे लोकल वाहतूक ही १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. वसई-विरारवरून दररोज सकाळी अनेक प्रवासी प्रवास करतात. मात्र आज विरारहून येणारी आणि विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी माहीमजवळ मालगाडीच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. तसेच हार्बर लाईनवरील अंधेरीकडे जाणारी आणि येणारी रेल्वेलाईन बंद होती. त्यानंतर काही वेळाने तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्यावर वाहतूक सुरू करण्यात आली होती.
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने #WesternRailway
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 28, 2019
Due to signal failure at Vasai Road all Suburban local trains are running late by 10 to 15min.
— DRM WR MumbaiCentral (@drmbct) March 28, 2019
पश्चिम रेल्वे मार्गावर वाढले फुकटे प्रवासी
पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासनीसांचे पथक उभारून एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ११६.८६ कोटींचा दंड वसूल केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १७.६७ टक्के दंडाची रक्कम वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर फुकट्या प्रवाशांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर आणि रेल्वे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासनीसांची अनेक पथके तयार करण्यात आली असून अशा प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. त्यानुसार पश्चिम रेल्वे प्रशासनाने २ हजार ३६३ तिकीट तपासनीसांचे पथक तयार करून विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल केला. यासह अनारक्षित साहित्य मेल, एक्स्प्रेस आणि लोकलमधून घेऊन जाणाऱ्या प्रवाशांच्या २५ लाख १७ हजार तक्रारी नोंदविल्या आहेत. या सर्व प्रवाशांकडून ११६.८६ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.