पश्चिम रेल्वे नव्या प्रवासी सेवांवर तब्बल १२०० कोटी खर्च करणार; १२२ प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:51 IST2025-01-07T11:50:59+5:302025-01-07T11:51:44+5:30
७१६ प्रकल्पांचे उदघाटन

पश्चिम रेल्वे नव्या प्रवासी सेवांवर तब्बल १२०० कोटी खर्च करणार; १२२ प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वे यावर्षी प्रवाशांच्या सुविधांवर हजार ते बाराशे कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ८० टक्के अधिक असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. यंदा मुंबईतील १२२ प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य पश्चिम रेल्वेचे लक्ष्य आहे.
पश्चिम रेल्वेतर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यांत दिव्यांगांसाठी सुविधा, प्लॅटफॉर्मचा विस्तार, एफओबी, लिफ्ट, स्टेशनची नवीन इमारत, रॅम्पची सुधारणा, पाण्याची सुविधा, प्लॅटफॉर्मवर शेड आणि स्थानकांची पुनर्बांधणी अशा अनेक कामांचा समावेश आहे.
रेल्वे प्रकल्पांसाठी गेल्या वर्षापर्यंत ४०० ते ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असे. परंतु यंदा या प्रकल्पांवर हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या वर्षी प्रवासी सुविधांवर पूर्वीपेक्षा जास्त खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले असून पुढच्या वर्षीही इतक्याच रकमेची तरतूद अंदाजित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत १२२ प्रकल्प सुरू आहेत. संपूर्ण पश्चिम रेल्वे मार्गावरील सुमारे ७१६ प्रकल्पांचे उदघाटन करण्याचे लक्ष्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदा पूर्ण होणारे प्रकल्प
विभाग कामे
- मुंबई सेंट्रल (उपनगरीय) १२२
- मुंबई सेंटर ८८
- वडोदरा २०१
- रतलाम ७८
- अहमदाबाद १५६
- राजकोट १९
- भावनगर ५२
एकूण ७१६
प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे.
- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे