डेंग्यू, मलेरिया डास मारण्यासाठी पश्चिम रेल्वेचा ड्रोनचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 08:47 PM2020-07-16T20:47:20+5:302020-07-16T20:47:43+5:30
लोकमत वृत्ताची घेतली दखल
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ कार्यशाळेत डासाच्या अळ्या आढळून आल्या होत्या. 'लोकमत'ने यासंबंधीचे वृत्त रविवारी प्रकाशित केले होते. त्यानंतर पश्चिम रेल्वेने महापालिकेच्या सहकार्याने ड्रोनद्वारे संपूर्ण लोअर परळ कार्यशाळेत जंतुनाशक फवारणी केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ कार्यशाळेत अनेक ठिकाणी अळ्या आढळून आल्या होत्या. रेल्वे इंजिनचे काम करत असलेल्या ठिकाणीच अळ्या होत्या. यामुळे कोरोनासह कार्यशाळेवर डेंग्यूचे संकट आले असल्याची प्रतिक्रिया येथील कर्मचाऱ्यांनी दिली.
या संदर्भात 'लोकमत'ने वृत्त दिले. त्यानंतर पश्चिम रेल्वेने कार्यशाळेवर फवारणी केली. पश्चिम रेल्वेच्यावतीने कार्यशाळेत जमिनीवर जंतुनाशकाची फवारणी केली जात होती. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या डासांची उत्पत्ती नियंत्रणात येते. हि सर्व कामे हाताने केली जात होती. मात्र महापालिकेच्या साहाय्याने कार्यशाळेतील हात न पोचणाऱ्या ठिकाणी, छतावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली आहे. कार्यशाळेच्या ५०० मीटर उंची वर प्रत्येक दिवशी १२ तास १५ लिटर जंतुनाशक फवारणी करण्यात आली. ड्रोनच्याद्वारे कार्यशाळेवर जंतुनाशकाची फवारणी करणे भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच झाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
लोअर परळ कार्यशाळा हि खोलगट भागात आहे. त्यामुळे येथे पाणी भरण्याची समस्या असते. त्यामुळे येथे साफसफाई करण्यावर भर दिला जातो. छत, भुयारी गटारे, पाईप लाईन यांची स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे. यासह ज्या ठिकाणी कर्मचारी स्वता पोहचू शकत नाही. तेथे ड्रोनचा वापर करून जंतूनाशक फवारणी करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.