मुंबई : पश्चिम रेल्वेवर विरारच्या दिशेने जाताना अंधेरीच्या पुढे येणारे तांत्रिक गोंधळ संपुष्टात आणण्यासाठी महत्त्वाचे काम पूर्णत्वास जात आहे. अंधेरी येथे यार्डाकडील तांत्रिक दुरुस्ती आणि बदलाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्चअखेरीस पूर्ण होणार आहे. त्यानंतर अंधेरीपुढे गाड्यांचे रखडणे कमी होणार आहे.‘परे’वर गेल्या काही महिन्यांपासून लोकल वेळापत्रक अनेकदा विस्कळीत झाल्याची तक्रार आहे. वाढलेल्या फेऱ्या आणि अंधेरी यार्डाकडील अडचणींमुळे त्यात भर पडत होती. या स्थितीत परेने अंधेरी यार्डातील बदलासाठी प्रकल्प हाती घेतला. मूळ १४ कोटी रुपयांच्या कामातील पहिला टप्पा मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद केली आहे.पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर अंधेरी ते जोगेश्वरी येथे वळणाकडील रेल्वेमार्गावरील वेगमर्यादेचे निर्बंध संपुष्टात येणार आहेत. आत्तापर्यंत इथल्या वळणावर १५ किमी प्रतितास वेगाचे बंधन आहे. ही मर्यादा एप्रिलपासून ३० किमी प्रतितासापर्यंत वाढणार आहे. त्यामुळे आपसूकच वेगात वाढ होत वक्तशीरपणात सुधार होईल, असे ‘परे’चे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पश्चिम रेल्वे होणार अधिक वक्तशीर...
By admin | Published: March 18, 2016 2:52 AM