मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, शुक्रवारपासून लोकल सेवेत करणार वाढ; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 09:38 PM2021-01-26T21:38:21+5:302021-01-27T08:29:54+5:30
Western Railway : गेल्या दहा महिन्यांपासून मुंबईतील उपगरीय सेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांसाठी बंद आहे.
मुंबई - गेल्या दहा महिन्यांपासून मुंबईतील उपगरीय सेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांसाठी बंद आहे. मात्र आता राज्यातील आणि मुंबईतील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याने तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने मुंबईतील उपनगरीय सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकल सेवेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने शुक्रवारपासून लोकल सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, मध्य रेल्वेने सध्या सुरू असलेल्या सेवांमध्ये वाढ करून त्या 1580 वरून 1685पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने, सध्या सुरू असलेल्या 1201 सेवांत वाढ करून त्या 1300 करण्यात येणार आहेत. परंतु, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा राहील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी लवकरच दिली जाईल, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले होते.