पश्चिम रेल्वेचे मोफत दिशा अॅप ‘अपडेट’ खाद्यपदार्थांच्या किमतीही समजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:22 AM2018-04-12T05:22:44+5:302018-04-12T05:22:44+5:30
लाखो रेल्वे प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने दिशा अॅपच्या सुधारित आवृत्तीचे लोकार्पण केले आहे. सुधारित दिशा अॅपनुसार स्थानकाच्या कोणत्या फलाटावर किती मिनिटांमध्ये लोकल येईल, हे एका क्लिकवर पाहता येईल.
मुंबई : लाखो रेल्वे प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने दिशा अॅपच्या सुधारित आवृत्तीचे लोकार्पण केले आहे. सुधारित दिशा अॅपनुसार स्थानकाच्या कोणत्या फलाटावर किती मिनिटांमध्ये लोकल येईल, हे एका क्लिकवर पाहता येईल. स्थानक स्टॉलवरील खाद्यपदार्थांच्या किमतीदेखील मोबाइलमध्ये पाहता येणार असून, सुधारित अॅपमध्ये लाइव्ह अपडेटची सुविधाही पश्चिम रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे.
डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत पश्चिम रेल्वेने फेब्रुवारी २०१६मध्ये प्रवाशाभिमुख ‘दिशा अॅप’ सुरू केले होते. सुधारित दिशा अॅपची जोडणी ट्रेन व्यवस्थापन यंत्रणेशी (टीएमएस) केली आहे. परिणामी मोबाइलच्या एका क्लिकवर स्थानकावरील कोणत्या फलाटावर किती वेळात लोकल येईल? याची माहिती मिळणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर ३० मिनिटे, ४५ मिनिटे आणि १ तास या तीन गटांमध्ये आगामी लोकलची माहिती प्रवाशांना मिळणार
आहे. उशिराने येणाऱ्या लोकलची माहितीदेखील प्रवाशांना मोबाइलमध्ये पाहता येणार आहे.
रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री केंद्रावर जास्त पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी सुधारित अॅपमध्ये प्रवाशांना स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या किमतीही दिसणार आहेत.
>माहिती मिळणार
दिशा अॅप प्रवाशांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरत आहे. या अॅपच्या सुधारित आवृत्तीसाठी प्रवाशांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार सुधारित आवृत्तीमध्ये योग्य ते बदल करण्यात आले आहेत. अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना जम्बो ब्लॉकसह हॉलिडे विशेष ट्रेन, रद्द करण्यात आलेल्या ट्रेन आदी ट्रेनशी संबंधित सर्व माहिती मिळेल. अँड्राइड आणि आयओएस दोन्ही यंत्रणांवर दिशा अॅप मोफत डाउनलोड करणे शक्य आहे.
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे